मुंबई : इराकची (Iraq) राजधानी बगदादमधील रुग्णालयात (Covid Hospital) लागलेल्या भीषण आगीत ( Fire) किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या कोरोना वार्डमध्ये ही मोठी आग लागली. या वार्डमध्ये कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यात येत होते. तेथे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत 12 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिणी बगदादमधील अल हुसेन शिक्षण रुग्णालयात ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या आगीनंतर मोठा भडका उडाल्याने बहुतांश लोकांचा मृत्यू झाला असून जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे बोलले जात आहे. परंतु या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्यात आलेली नाही.
आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट हे देखील आग पसरण्याचे कारण असल्याचे सांगितले गेले आहे. आतापर्यंत शासनाकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नाही. फक्त तीन महिन्यांपूर्वी रुग्णालयात नवीन कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आला होता, त्यामध्ये 70 बेडची व्यवस्था करण्यात आली होती.
आरोग्य विभागाचे प्रवक्ते आमिर जमीली म्हणाले की, ही घटना घडली तेव्हा वॉर्डमध्ये 63 रुग्ण दाखल होते. इराकचे नागरी संरक्षण प्रमुख मेजर जनरल खालिद बोहन म्हणाले, हॉस्पिटलच्या बांधणीत ज्वलनशील साहित्य वापरण्यात आले, त्यामुळे आग अधिक भडकली आणि ती पसरली.
इराकमधील इस्पितळात आगीमुळे इतक्या मोठ्या संख्येने कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची वर्षातील ही दुसरी घटना आहे. एप्रिलमध्ये अशाच एका घटनेत 83 लोकांनी प्राण गमावले होते. ऑक्सिजन टाकीमध्ये स्फोट झाल्यानंतर इब्न अल खतीब रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेला आग लागली.
या घटनेने पुन्हा एकदा इराकच्या रूग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली असून गैरप्रकार उघडकीस आला आहे. देशातील कोरोनाचे वाढते प्रकरण यादरम्यान असे अपघात गंभीर प्रश्न निर्माण करतात. मागील आठवड्यात येथे 9 हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.