Artificial Intelligence मुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य होत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान मानवी आयुष्य आणखी सुखकर करत क्रांती घडवेल असे अंदाज वर्तवले जात आहेत. दरम्यान, हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातही मोठे बदल घडवत अशक्य गोष्टीही सहजपणे साध्य करण्यात मदत करण्याची शक्यता आहे. नुकतंच याचं एक उदाहरणही सर्वांना पाहायला मिळालं असून त्याला वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार म्हटलं जात आहे. Artificial Intelligence च्या मदतीने केलेल्या सर्जरीमुळे अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा पहिल्यासारखं आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.
Artificial Intelligence च्या मदतीने करण्यात आलेली ही सर्जरी म्हणजे आधुनिक वैद्यकीय जगातील एक चमत्कारच असल्याचं म्ह़टलं जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील एका व्यक्तीला पाण्यात उडी मारल्यानंतर पक्षघाताचा झटका आला होता. मशीन लर्निंग आधारित सर्जरी केल्यानंतर त्याच्या शरिरात पुन्हा एकदा हालचाल आणि भावना जाणवत आहेत. यासाठी माइक्रोइलेक्ट्रोड इंप्लांटच्या मदतीने या व्यक्तीचा मेंदू संगणकाशी जोडण्यात आला होता.
मॅनहॅसेटमधील फिनस्टीन इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चमधील तज्ज्ञांचा दावा आहे की, 45 वर्षीय किथ थॉमसचं हे प्रकरण अंधत्व, बहिरेपणा, झटके येणं, सेरेब्रल पाल्सी आणि पार्किन्सन्स यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी AI-इन्फ्युज्ड शस्त्रक्रियेची मदत घेण्यात उपयुक्त ठरू शकतं.
फिनस्टीन इन्स्टिट्यूट ऑफ बायोइलेक्ट्रॉनिक मेडिसिनचे प्राध्यापक चाड बॉटन यांनी न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना सांगितलं की, "अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला त्याचा मेंदू, शरीर आणि पाठीचा कणा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जोडून हालचाल आणि संवेदना प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही जगभरातील लोकांना मदत करत राहू. यापेक्षा मोठी प्रकरणंही आम्ही कदाचित हाताळू".
2020 मध्ये थॉमस पूर्णपणे बरे झाले होते. ते एक यशस्वी वेल्थ मॅनेजर होते आणि दोन दशकांहून जास्त काळ मॅनहट्टन येथे राहत होते. मित्रासह स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना त्यांच्या मानेचं हाड तुटलं होतं. त्यांच्या पाठीच्या कण्यालाही दुखापत झाली होती. पाण्यातच त्यांच्या डोळ्यापुढे अंधार आला होती. जेव्हा डोळे उघडले तेव्हा आपण शरिरावर नियंत्रण ठेवू शकत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांना मानेखालील भागाची हालचाल करु शकणार नाही असं सांगण्यात आलं होतं. पण त्यांनी पराभव स्विकारला नव्हता.
थॉमस यांनी सर्जरीला पैसे गोळा करण्यासाठी एक डोनेशन पेज तयार केलं होतं. अनेकांनी त्यांना ढोबळ मनाने मदत केली होती. थॉमस यांच्यावर तब्बल 15 तास सर्जरी सुरु होती. यावेळी ते जागे होते आणि सतत डॉक्टरांशी बोलत होते.
अर्धांगवायूचे जीवन जगणाऱ्या थॉमस यांना आता पुन्हा एकदा खांद्यावर आणि हातात संवेदना जाणवू शकतात. त्याच्या विचारांना, स्नायूंना आणि पाठीच्या कण्याला पाठवलेल्या इलेक्ट्रॉनिक सिग्नल्समध्ये रूपांतरित करण्यासाठी मेंदू प्रत्यारोपण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्या प्रणालीमुळे तो हे करू शकतो. हे सिग्नल त्याच्या दुखापतीच्या जागेला बायपास करतात आणि त्याच्या मान आणि हातावरील पॅचशी जोडतात. तसंच त्याच्या मेंदूशी संवाद साधत, हालचाल आणि भावना देतात.