मोदींनी पाकिस्तान, चीनला सुनावलं! बायडेन यांच्या समोरच White House मधून साधला निशाणा

PM Modi Slams China Pakistan From White House: मोदींनी आज राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या आमंत्रणावर व्हाइट हाऊसमधील डिनरला हजेरी लावली. यावेळेस दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना मोदींनी पाकिस्तान आणि चीनला खडे बोल सुनावले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2023, 11:01 AM IST
मोदींनी पाकिस्तान, चीनला सुनावलं! बायडेन यांच्या समोरच White House मधून साधला निशाणा title=
व्हाइट हाऊसमधील कार्यक्रमामध्ये मोदींचं विधान

PM Modi Slams China Pakistan From White House: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सध्या अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधांचा हा पहिलाच राजकीय दौरा असून अशाप्रकारे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावर अमेरिकेत जाणारे मोदी हे डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतरचे दुसरेच पंतप्रधान ठरले आहेत. अमेरिकेमध्ये मोदींचं भव्य स्वागत झालं. तसेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी जिल बायडेन यांनी मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये विशेष भोजन समारंभाचं (White House Dinner) आयोजन केलं होतं. मोदींनी व्हाइट हाऊसला दिलेल्या भेटीदरम्यान प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. या चर्चेमध्ये मोदी आणि बायडेन यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलं. एका उत्तरादरम्यान मोदींनी पाकिस्तान आणि चीनवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

दहशतवाद आणि कट्टरतावाद

जगातून दहशतवाद संपवण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन काम करत असल्याचं मोदींनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. तसेच भविष्यात दोन्ही देश दहशतवादाविरुद्धची मोहिम अधिक तिव्र करणार असल्याचंही मोदींनी म्हटलं. "आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्यासंदर्भातील आमचे प्रयत्न सुरु आहे. भारत आणि अमेरिका दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये एकत्र वाटचाल करत राहतील," असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. भारत आणि अमेरिका कट्टरतावाद्यांविरुद्ध एकत्र लढा देईल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. दहशतवादाविरोधात कारवाई होणं आवश्यकच असल्याचं मोदींनी म्हटलं. 

इंडो-पॅसिफिक क्षेत्राचा विकास

"सीमेपलीकडे सुरु असलेला दहशतवाद संपवण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये शांतता आणि सुरक्षा कायम राखण्यास आमचं पहिलं प्राधान्य आहे. या क्षेत्राचा विकास व्हावा याबद्दल आमचं एकमत असून हा विकास झाला तर संपूर्ण जगाला याचा फायदा होईल म्हणूनच हे क्षेत्र महत्त्वाचं आहे," असं मोदींनी म्हटलं. पंतप्रधान मोदींनी थेट कोणाचाही उल्लेख केला नाही. मात्र सीमेपलिकडील दहशतवादमधून पाकिस्तानला तर इंडो-पॅसिफिकचा उल्लेख करत त्यांनी चीनला इशारा दिल्याचं स्पष्ट होत आहे. 

नक्की वाचा >> "हाततल्या ग्लासात दारु नसेल तर..."; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video

 

9/11 चा आणि 26/11 च्या हल्ल्यांचा उल्लेख

हिंदी महासागारमध्ये अनेकदा वाद झाल्याचं पहायला मिळत. मात्र आम्हाला एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करायची आहे. 9/11 चा हल्ला आणि 26/11 च्या हल्ल्यानंतर दहशतवाद हा फार चिंतेचा विषय झाला आहे. या हल्ल्यांना एका दशकाहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी कट्टरतावाद आणि दहशतवाद हा जगासमोरील मोठा प्रश्न आहे. या विचारसणी अनेकदा आपलं स्वरुप बदलतात आणि नवीन ओळख निर्माण करतात. मात्र त्यांचा हेतू हा घातपाताचाच असतो, असंही मोदी म्हणाले.

दहशतवाद मानवतेचा शत्रू

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. त्यामुळे त्याला तोंड देताना जर-तरचा विचार करता येणार नाही. सर्वांचे प्रयत्न हे ठाम निश्चयासहीत हवेत. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपण एकत्र लढा दिला पाहिजे. आम्ही दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्याच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्वांवरच नियंत्रण मिळवलं पाहिजे.