नवी दिल्ली : आठ ग्रह असलेली एक नवीन सूर्यमाला २,५४५ प्रकाश वर्ष अंतरावर सापडली आहे.
आपल्या सूर्यमालेप्रमाणेच तिथेसुद्धा एक ग्रह असून तो आपल्या ताऱ्यापासून सूर्यमालेत तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. १४.४ दिवसांत हा ग्रह आपल्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. या ताऱ्याला केपलर-९० असं नाव देण्यात आलंय.
हा शोध नासाच्या अंतराळातील केपलर या दुर्बीणीकडून मिळालेल्या माहितीचा वापर करून लागला आहे. यात कृत्रीम बुद्धीमत्तेचासुद्धा वापर करण्यात आला.
इतर ताऱ्यांनासुद्धा आपल्या सूर्याप्रमाणेच सूर्यमाला असतात हे यातून सिद्ध झालय. त्याचप्रमाणे या प्रकारच्या दूरवरच्या ताऱ्यांचा अभ्यास करताना आणि शोध लावताना या प्रकारच्या तांत्रिक क्षमतांचं महत्व अधोरेखीत केलं.
या नवीन सूर्यमालेतील ग्रह हे पृथ्वीप्रमाणेच गुरू आणि नेपच्युनशी साधर्म्य दाखवतात. आणखी एका बाबतीत ही सूर्यमाला आपल्यासारखी आहे, ते म्हणजे लहान ग्रह सूर्याच्या जवळ आहेत तर मोठे ग्रह सूर्यापासून लांब आहेत.
परंतु एका गोष्टीत मात्र ती आपल्यापेक्षा वेगळी आहे. या सूर्यमालेतील सर्वच ग्रहांची प्रदक्षिणा ३६५ दिवसांच्या आतली आहे. त्यामुळे ग्रहांचं एकमेकांपासूनचं अंतर तुलनेने कमी आहे. याचाच परिणाम म्हणून तिथलं तापमान प्रचंड जास्त आहे. या नवीन सूर्यमालेतील ग्रहांचं सरासरी तापमान ४२६ डिग्री सेल्सिअस आहे.