जिनिव्हा : WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेकडून सातत्यानं साऱ्या जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना व्हायरसविषयीचा आढावा घेत साऱ्या जगाला सतर्क करण्यात येत आहे. सध्याही जागतिक आरोग्य संघटनेकडून या विषाणूच्या वाढत्या संसर्गाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देत खुद्द WHO प्रमुखांनीच याबाबतचा इशारा दिला आहे.
कोरोनामुळं उदभववेली सद्यस्थिती पाहता पूर्वीप्रमाणे असणारी परिस्थिती परतणं आता शक्य नाही. किंबहुना स्पष्ट शब्दांत सांगावं तर, भविष्यात हे पूर्वीचं आयुष्य, राहणीमान परतणार नसल्यामुळं, 'न्यू नॉर्मल' या संकल्पनेसह सर्वांना जगावं लागणार आहे.
WHO प्रमुख टेड्रोस एडहोम घेबियस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सोमवारी हा अतिशय महत्त्वाचा इशारा साऱ्या जगाला दिला. या महामारीच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं तर, परिस्थिती आणखी बिघडू शकते याबाबत सर्वांनाच सावध करत ते म्हणाले, 'कित्येक देशांमध्ये परिस्थिती अतिशय चुकीच्या दिशेनं पुढं जात आहे. ज्याममुळं हा विषाणू नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. मूळ निर्देशांचं पालन न केलं गेल्यास या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळणार आहे'.
हिवाळ्यात वाढणार धोका
अनेक अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या घडीला जगभरातील अनेक राष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहेत. ब्रिटनमध्ये विशेषत: हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. त्यात थंड वातावरणात कोरोनाचा फैलाव जास्त होण्याचं निरिक्षण असल्यामुळं हा काळ सावधगिरीचा असेल.