कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्याला फोन केला तर, बॉसला होईल शिक्षा

अनेक ठिकाणी बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना वेठिस धरतात, या निर्णयाने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

Updated: Nov 9, 2021, 10:40 PM IST
कार्यालयीन वेळेनंतर कर्मचाऱ्याला फोन केला तर, बॉसला होईल शिक्षा title=

लिस्बन : देशातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्य आणि निरोगीपणासाठी पोर्तुगाल (Portugal) सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जो बॉस आपल्या कर्मचाऱ्याला कामाचे तास सुरु होण्यापूर्वी किंवा कार्यालयीन वेळ संपल्यानंतर फोन करेल त्या बॉसला शिक्षा होईल, पोर्तुगाल सरकारने तसा अध्यादेशच (Portugal New Labour Laws)काढला आहे.

युरो न्यूजनुसार, पोर्तुगालच्या कामगार आणि सामाजिक सुरक्षा मंत्री एना मेंडिस गोडिन्हो यांनी लिस्बनमध्ये ही घोषणा केली. ते म्हणाले की, कोरोना व्हायरसमुळे  (Coronavirus) घरून काम करणे आता एक नवीन वास्तव बनलं आहे. अशा परिस्थितीत, दूरस्थ कामकाज  शक्य तितके सोपे करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा अध्यादेश गेम चेंजर ठरू शकतो.

अहवालानुसार, अनेक ठिकाणी बॉस आपल्या कर्मचाऱ्यांना  वेठिस धरतात. कामाचे तास संपल्यानंतरही ते आपल्या कर्मचाऱ्यांवर कॉल किंवा मेसेज करून दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या कर्मचार्‍यांना कोणतीही असाइनमेंट किंवा प्रोजेक्ट अगोदर तयार करण्यासाठी कॉल करतात. यामुळे कर्मचाऱ्यांवर नेहमीच दबाव असतो. ज्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवरही याचा परिणाम होतो.

या अध्यादेशात (Portugal New Labour Laws) असं म्हटलं आहे की, जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूल लहान असेल, तर ते मूल 8 वर्षांचं होईपर्यंत कर्मचारी घरून कामाची मागणी करू शकतो. त्याच्या बॉसने ही मागणी सक्तीने मान्य केली पाहिजे. असं न केल्यास कंपनीला दंड आणि शिक्षा होऊ शकते.

मंत्र्यांनी सांगितले की, कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत. कर्मचाऱ्यांनी घरून काम केल्यामुळे कंपन्यांच्या वीज, पाणी यासह सर्व खर्चात मोठी बचत होऊ शकते. कंपन्यांनी हा नफा त्यांच्या कर्मचाऱ्यांना वितरित करावा.

या कायद्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक-कौटुंबिक जीवन सुधारणं अपेक्षित आहे. पोर्तुगाल सरकारचा हा अध्यादेश (Portugal New Labour Laws) ज्या कंपन्यांमध्ये 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्यांना लागू होईल.