मुंबई : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II ) यांचं वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं आहे. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स III राजा झाले आहेत. यासगळ्यात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील लॉकरमध्ये राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या हातानं लिहिलेलं एक गुप्त पत्र ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे हे गुप्त पत्र पुढील 63 वर्षे उघडता येणार नाही.
हे पत्र राणी एलिझाबेथ यांनी 1986 मध्ये लिहिले होते. या गुप्त पत्राची माहिती ऑस्ट्रेलियाच्या 7NEWS नं दिली आहे. त्यानुसार हे पत्र सिडनीतील एका ऐतिहासिक इमारतीत ठेवण्यात आलं आहे. या पत्रात काय लिहिले आहे याविषयी कोणालाच काही माहिती नाही. राणीच्या पर्सनल स्टाफलाही याची माहिती नसल्याचं म्हटलं जातं. हे पत्र अज्ञात ठिकाणी काचेच्या पेटीत लपवून ठेवलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे पत्र 2085 पर्यंत उघडणार नसल्याचे समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, हे पत्र सिडनीच्या लॉर्ड मेयरला उद्देशून लिहिले आहे. त्याचा अर्थ काहीसा असा आहे की, 2085 मध्ये एखाद्या योग्य दिवशी तुम्ही हे पत्र उघडून माझा संदेश सिडनीच्या नागरिकांपर्यंत पोहोचवाल का? या पत्रात एलिझाबेथ आर. यांची स्वाक्षरी आहे. राज्याच्या प्रमुख म्हणून राणी एलिझाबेथ II यांनी 16 वेळा ऑस्ट्रेलियाला भेट दिली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी शुक्रवारी सांगितले की, ऑस्ट्रेलियातली त्यांची सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या भेटीतून हे स्पष्ट होते की त्यांच्या हृदयात ऑस्ट्रेलियासाठी विशेष स्थान आहे. ऑस्ट्रेलियाने 70 वर्षांतील पहिला नवीन शासक म्हणून राजा चार्ल्स III ला स्वीकारले.