दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये..
फेरीवाल्यांविरोधात सध्या सुरु असलेल्या कारवाईवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या शुक्रवारी व्हीजेटीआयमधील एका परिसंवादात आपलं मत मांडले... आणि त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा रोष ओढवून घ्यावा लागला... त्या कार्यक्रमात नानानं फेरीवाल्यांच्या बाजूनं आपले मत व्यक्त केलं... आणि त्याचे पडसाद शनिवारी थेट वांद्रयातल्या रंगशारदा सभागृहाच्या व्यासपीठावर, मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात उमटले... ठाकरेंनी नाना पाटेकर यांचा महात्मा असा उपहासात्मक उल्लेख करीत आपल्या शैलीत समाचार घेतला... नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये,असं ठाकरेंनी सुनावलं....
नाना पाटेकर यांना राज ठाकरेंनी जाहिर सुनावण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही... यापूर्वीही हे घडले आहे.... मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी 2011 मध्ये विलेपार्ल्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत घेतली होती. त्यावेळी नाना पाटेकर यांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी राज आणि उद्धव या ठाकरे बंधूनी एकत्र यावे, असं मत व्यक्त केलं होतं... त्यावर राज यांचीही तडक प्रतिक्रिया आली होती...नानानं उगाच नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये, असं त्यांनी सुनावलं होतं... राज ठाकरे यांना नाना पाटेकर यांनी मत व्यक्त करताना घेतलेल्या स्वातंत्र्याचा बहुदा राग आला असावा. पण नाना पाटेकर यांनीही त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखलं... आणि हा वाद मोठा होणार नाही याची काळजी घेतली. राज ठाकरे यांनीही लगेचच दुसऱ्या दिवशी नाना पाटेकर यांच्या माटुंगा येथील येथील घरी कुटुंबियांसह जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होते. आणि त्या वादावर पडदा पडला होता....
नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्यात आता पुन्हा तणाव निर्माण झालाय...पण कदाचित यावेळी समेट घडवण्याचं ठिकाण बदललेलं असेल.. रविवारी सकाळी नाना पाटेकर यांची कृष्णकुंजवर चहाच्या निमित्तानं हजेरी असेल.... आणि निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा पुन्हा प्रयत्न होईल !!!!!