T20 world cup 2022 : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या आहेत. पण सामन्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay hah) यांनी स्पष्ट केले होते की, भारतीय संघ 2023 च्या आशिया कपमध्ये खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. यानंतर पीसीबीने 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकात न खेळण्याची धमकी दिली होती.
आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. ओवेसी यांनी आशिया कप 2023 पाकिस्तानमध्ये न खेळण्याच्या भारतीय संघाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाकिस्तानशी सामना खेळू शकतो, पण पाकिस्तानला जायचे नाही, असे ते म्हणाले.
'उद्या ऑस्ट्रेलियात पाकिस्तानशी का खेळत आहात? आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, पण त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियात खेळू. पाकिस्तानशी खेळू नका. पाकिस्तानशी न खेळल्यास काय होईल? टीव्हीसाठी हजारो कोटींचे नुकसान? पण ते भारतापेक्षा मोठं आहे का? सोडू द्या, खेळू नका."
ओवेसी पुढे म्हणाले की, "जर भारत हरला तर कोणाची चूक होती ते शोधत बसाल. मला माहित नाही की सामना कोण जिंकेल, पण मला वाटते की, माझ्या भारताने जिंकावे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सारखी आमची मुले पाकिस्तानला हरवण्यासाठी चांगले खेळतील.”
आशिया कप 2023 ची स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे परंतु बीसीसीआयने आपल्या संघाला पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबत तातडीची बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे.