मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातन प्रेक्षकांसोबत एक नातं जपत कलाकार मंडळी त्यांनाही आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग करतात. पण, याच सेलिब्रिटींना सोशल मीडियामुळे बऱ्याचदा काही अशा प्रसंगांचा सामना करावा लागतो, जेव्हा त्यांच्चाय सहनशीलतेचाही अंत होतो. अशा वेळी परिस्थिती समजुतदारपणे हाताळण्यालाच सेलिब्रिटींचं प्राधान्य असतं.
सोशल मीडियावर सध्या '३ इडियट्स' फेम अभिनेता आर. माधवन याला अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. रक्षाबंधनच्या दिवशी अवनी अविट्टमच्या निमित्ताने माधवन याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये माधवन हा त्याचे वडील रंगनाथन माधवन आणि मुलगा वेदांत यांच्यासोबत एका पुजेसाठी बसल्याचं दिसत होतं.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये मॅडीच्या घरातील देवालयही दिसत आहे. याच देवाऱ्यात असणाऱ्या ख्रिस्त धर्माचं प्रतिक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 'क्रॉस' या चिन्हावर अनेक नेटकऱ्यांची नजर गेली. ज्यानंतर याच मुद्द्यावरुन मॅडीवर एका युजरने टीकाही केली.
त्यांनी घरातील देवाऱ्यात क्रॉस का ठेवलं आहे? हा देवाराच आहे ना? असं म्हणत माझ्या नजरेत असणारा तुमच्याप्रतीचा आदर कमी झाला आहे, ही प्रतिक्रिया त्या युजरने दिली. ख्रिस्तधर्मीयांच्या चर्चमध्ये हिंदू देवदेवता पाहिल्या आहेत का, असा प्रश्नही त्या युजरने उपस्थित केला. मुख्य म्हणजे हे ट्विट कालांतराने डिलीटही करण्यात आलं.
आपल्या पोस्टवर येणारी ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मॅडीनेही ट्विट करत त्याची बाजू मांडली. मला तुमच्यासारख्यांच्या आदराची काहीच फिकिर नाही, असं म्हणत तिथे असणारा सुवर्ण मंदिराचा फोटो तुम्हाला दिसला नाही, त्यावर तुम्ही विचारलं नाही की मी शीख धर्म स्वीकारला आहे का? असं म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली.
https://t.co/Imw3SqR2Zb pic.twitter.com/x79cX50aRn
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) August 16, 2019
स्वत:चं अस्तित्व तितक्याच अदबीने कायम राखत प्रत्येक जात, धर्म आणि पंथाचा आदर करण्याची मला शिकवण देण्यात आली असल्याचं त्याने खडसावून सांगितलं. प्रत्येक धर्म हा माझा स्वत:चाच आहे, याचप्रमाणे मी त्या धर्माचा आदर करतो आणि माझ्या मुलानेही तसंच आचरण ठेवावं असं मला वाटतं अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.