मुंबई : कोरोना Corona व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानात काही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दीची ठिकाणं टाळा असं वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याच धर्तीवर कोरोना व्हायरच्या काळात अनेक क्षेत्रांमधील कामकाजही पूर्णपणे ठप्प असल्याचं पहायला मिळत आहे. चित्रपट जगत किंवा एकंदरच संपूर्ण कलाविश्वही याला अपवाद नाही. विविध मालिका, चित्रपट आणि कित्येक आगामी प्रोजेक्टची कामं ही तूर्तास थांबवण्यात आली आहेत.
कोरोनामुळे ओढावलेल्या या संकटाच्या परिस्थितीचा फटका हातावर पोट असणाऱ्या वर्गाला सर्वात जास्त बसला. रोजंदारी भत्ता, मजुरी अशा स्वरुपात पैसे कमवून उदरनिर्वाह करणाऱ्या याच वर्गासाठी आता काही बड्या सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दाक्षिणात्य कलाविश्वात थलैवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजनीकांत यांनी अशाच मंडळींना मदत म्हणून ५० लाख रुपयांची मदत दिली आहे. दाक्षिणात्य चित्रपट विश्वात रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी त्यांनी ही मदत केली आहे.
रजनीकांत यांच्यासोबतच सुर्या, कार्ती, विजय सेतुपती या लोकप्रिय कलाकारांनीसुद्धा आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडमध्येही काही सेलिब्रिटींनी पुढाकार घेत रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना मदत केली आहे. आर्थिक मदतीसोबतच काही सेलिब्रिटींनी अन्नधान्य उत्पादनांचा पुरवठा करण्यासही पुढाकार घेतला आहे. एकंदरच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत प्रत्येकानेच आपल्या परिने सामाजिक भान जपलं आहे.