मुंबई : लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करा, असं सर्वच स्तरांतून सांगितलं जात असतानाच बुधवारी अभिनेता सलमान खान याच्या वडिलाचं नाव एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलं होतं. देशभरात Coronavirus कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असतानाच यादरम्यान सलीम खान हे त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाहून बाहेर पडत असल्याचं यादरम्यान म्हटलं गेलं. ज्यानंतर नियमांचं उल्लंघन केल्याच्या मुद्द्यावरुन अनेकांनीच त्यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली.
आपल्याविषयी होणाऱ्या याच चर्चांवर खुद्द सलीम खान यांनी स्पष्टीकरण दिलं. हा काही आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही. माझ्याकडे खास परवाना असूनही मी बाहेर जाणं बंद केलं आहे असं ते म्हणाले. दर दिवशी सकाळी आपण कबुतरांना दाणे टाकण्यासाठी म्हणून बाहेर जातो असं सांगत गेल्या कित्येक वर्षांपासून आपण असं करत आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय लॉकडाऊनचे नियम लागू झाल्यापासून आपण तेसुद्धा बंद केल्याची माहिती त्यांनी दिली.
ज्या प्रकारे हा मुद्दा चर्चेचा विषय केला जात हे, हे पाहून आपल्याला धक्काच बसल्याचं म्हणत अजूनही अनेकजण फेरी मारण्यासाठी म्हणून किंवा त्यांच्या प्राण्यांना फिरवण्यासाठी म्हणून बाहेर पडतात, त्यांच्याविरोधात मात्र आवाज उठवला जात नसल्याचं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सलमानचे आई-वडील हे त्याच्या वांद्रे येथील घरी आहेत. तर, खुद्द सलमान मात्र त्याच्या पनवेल येथील फार्हाऊसवर आहे. शिवाय त्याच्या कुटुंबातील कोणत्याच सदस्याकडून लॉकडाऊनच्या नियामांचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन करण्यात आलेलं नाही हेच इथे स्पष्ट होत आहे.