Dada Kondke Movies : सत्तरच्या दशकातील मराठी सिनेमा आठवून बघा. तमाशापटांचा काळ सरला होता आणि विनोदी सिनेमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. गावरान मातीतला अस्सल विनोद, रोजच्या जगण्यातील कथा, खळखळून हसवणारे विनोदी संवाद यांची गट्टी जमवून दादा कोंडके नावाचं एक पर्व मराठी सिनेमासृष्टीत दाखल झालं. 1969 ला पडद्यावर आलेल्या ‘ तांबडी माती ’ या सिनेमाने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक दादा कोंडके हे रत्न मराठी सिनेमाला दिले. त्यानंतर गेली 50 वर्षे दादा कोंडके हे नाव आजही मराठी सिनेमावर राज्य करत आहे. दादा कोंडके यांच्या सिनेमाची पारायणं करत सत्तरच्या दशकातील तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमा गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे. आजच्या तरूणाईलाही दादांच्या सिनेमातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो , यातच दादांनी प्रेक्षकांची मनं कशी जिंकली आहेत हे दिसून येतं.
8 ऑगस्ट 1932 ला जन्मलेल्या दादांचा 1969 ला ‘ तांबडी माती ’ या सिनेमापासून सुरू झालेला प्रवास 1994 ला ‘ सासरचं धोतर ’ या सिनेमापर्यंत येउन थांबला. येत्या 8 ऑगस्टला दादा कोंडके यांची 91 वी जयंती आहे. यानिमित्ताने दादांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी आणली आहे. विनोदसम्राट दादा कोंडके हे एक असं पर्व होतं ज्याने मराठी सिनेमाला मातीतल्या अस्सल विनोदीपटाचा परिसस्पर्श दिला. त्या दादांना त्यांच्या ज्युबिलीस्टार 6 सिनेमांद्वारे मानाचा मुजरा करण्यासाठी झी टॉकीज सुद्धा सज्ज झाले आहे.
पाच दशके होत आली तरी ज्यांचा सिनेमा आजही ताजातवाना वाटतो, त्यातील विनोद खळखळून हसवतो त्या विनोदाच्या सम्राटाला झी टॉकीजमुळे पुन्हा भेटण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. विनोदातील निखळपणा कायम ठेवत शाब्दीक कोट्यांमधून इरसाल फटाकडे वाजवणाऱ्या विनोदवीर अभिनेते , दिग्दर्शक ज्युबिलीस्टार दादा कोंडके यांच्या सहा ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी दादांच्या चाहत्यांना मिळणार आहे. 6 ऑगस्टपासून दर रविवारी दादा कोंडके यांच्या छप्परफाड प्रतिसाद मिळालेल्या सहा सिनेमांतून विनोदाच्या श्रावणसरी बरसणार आहेत. दुपारी 12 आणि सायंकाळी 6 वाजता दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांतून मनोरंजनाची बरसात होणार आहे. झी टॉकीज प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी वेगळं आणि खास मनोरंजन घेउन येत असते. मराठी सिनेमाला विनोदी चित्रपटांचा सुवर्णकाळ दाखवणाऱ्या, मराठी मातीतील अस्सल गावरान सिनेमातून रांगडा नायक लोकप्रिय करणाऱ्या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांची मालिका सलग 6 रविवारी प्रेक्षकांसाठी झी टॉकीजने आणली आहे. यानिमित्ताने दादा कोंडके यांच्या अनेक आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.
हेही वाचा : फरदीन आणि त्याच्या वडीलांसोबत सेलिना जेटलीचे शारीरिक संबंध! आरोपांनंतर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य
दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे विनोदाचे अजब रसायन. सिनेमाची कथा, संवाद, दिग्दर्शन, गाण्यांची निवड या सगळ्यात दादांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यांच्या काळातील हिंदी सिने-निर्मातेही, दादा कोंडकेंचा सिनेमा लागला की आपला सिनेमा पुढे ढकलायचे इतकी दादांच्या सिनेमांची लोकप्रियता होती. दादांच्या सिनेमाची कथा तर हिट व्हायचीच पण त्यांच्या सिनेमातील नायकाच्या रूपातील दादांचा तोरा , गाणी, संवाद यामुळे दादांचा सिनेमा किमान 25 आठवडे तरी थिएटरवर झळकलेला असायचा. दादांनी त्यांच्या कारकीर्दीत 16 सिनेमांची निर्मिती केली आणि ते सगळे सिनेमे रौप्यमहोत्सवी ठरले. दादा कोंडके यांचा नवा सिनेमा प्रदर्शित झाला की तो सिल्वर ज्युबिली साजरी करूनच पोस्टर खाली उतरणार हे समीकरणच होतं. त्यामुळे दादांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. त्यातूनच दादांच्या सिनेमांना ज्युबिलीस्टार सिनेमा अशी ओळख मिळाली. दादांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आणि अलगद रडवलेही. विनोदी सिनेमांनाही कारूण्याची किनार कशी द्यायची याची नस दादांना सापडली होती.
गुडघ्यापर्यंतच्या चड्डी, लोंबणारी नाडी, त्यावर हाफ हाताचा कुर्ता, केसांचा पैलवान कट, बारीक मिशी या रूपातील रांगडा नायक दादा कोंडके यांनी अफलातून साकारला. संवाद म्हणण्याची लकब आणि त्यात सहजपणे विनोदी फटकेबाजी म्हणजे दादांचा सिनेमा. त्याही पुढे जाउन दादा कोंडके यांचा सिनेमा कधीच शिळा होत नाही. तो कितीही वर्षांनी पुन्हा थिएटरला लागला की ही ढीग गर्दी ठरलेलीच. टीव्हीवर दादांचा सिनेमा लागणार म्हटलं की हटकून वेळ काढून त्या विनोदाच्या लाटा झेलायला दादाप्रेमी तयार. आता हीच सगळी पर्वणी झी टॉकीज घेउन आली आहे. “अख्खा महाराष्ट्र हसणार खदाखदा... सुपरहिट चित्रपटांचा वादा, झी टॉकीजवर ज्युबिलीस्टार दादा” असं म्हणत झी टॉकीज वाहिनीतर्फे दादा कोंडके यांच्या स्मृती जागवल्या जाणार आहेत.
‘सासरचं धोतर’, ‘राम राम गंगाराम’, ‘ह्योच नवरा पाहिजे’ अशा सिनेमांचा आनंद देण्यासाठी दादा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दादा कोंडके आणि त्यांचे ब्लॉकबस्टर सिनेमे घेउन झी टॉकीज दादांचा कॉमेडी मसाला पुन्हा आणत आहेत. लवकरच ही उत्सुकता संपणार आणि दादा कोंडके यांच्या ज्युबिलीस्टार सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. दादांचे सिनेमे थिएटरमध्ये पाहिलेल्या प्रेक्षकांना तर तो काळ पुन्हा अनुभवता येईलच पण दादा कोंडके या नावाचा काय जलवा होता हे नव्या पिढीतील प्रेक्षकांनाही कळेल.