'या' शहरांमध्ये 'Dharamveer' ने रचला विक्रम... सर्वत्र चर्चा

आनंद दिघे यांच्या संघर्षावर आधारित 'धर्मवीर' सिनेमाला या शहरांमधून उत्तम प्रतिसाद  

Updated: May 17, 2022, 11:31 AM IST
'या' शहरांमध्ये 'Dharamveer' ने रचला विक्रम... सर्वत्र चर्चा title=

मुंबई : मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे कळाले.  कट्टर शिवसैनिक काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं.  13 मे रोजी दिघे साहेबांचा जीवनपट पडद्यावर आला आणि पहिल्याचं दिवशी सिनेमाने दणदणीत विक्रम रचला. 

पहिल्याच दिवशी 'धर्मवीर' सिनेमाने जवळपास 2.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण आणखी मोठा टप्पा अद्याप सिनेमाला गाठायचा आहे. गेल्या तीन दिवसांत सिनेमाने जवळपास  9.59 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

आता येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमाची सुरुवात चांगली झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक आणि मुंबई या शहरांमधून सिनेमाला अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित जीवनपट 400 हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याचे सुमारे 10,000 शो झाले.आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या. 

आनंद दिघे प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमामध्ये अभिनेता प्रसाद ओक यानं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सध्या सर्वत्र 'धर्मवीर' सिनेमाची चर्चा रंगली आहे.