मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीरचा 'शमशेरा' (Shamshera) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयानं 'शमशेरा' चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली आहे. यासोबतच यशराज फिल्म्सला 22 ऑगस्ट 2022 पर्यंत कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये एक कोटी रुपये जमा करावे लागतील, असा आदेशही कोर्टाने दिला आहे. माहितीसाठी ही समस्या कॉपीराइटचा नियम उल्लंघनाशी संबंधित आहे.
'शमशेरा'च्या ओटीटी रिलीझशी संबंधित खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती ज्योती सिंग यांनी विक्रमजीत सिंग भुल्लर यांनी दाखल केलेल्या दाव्यावर हा आदेश दिला आहे. भुल्लर यांनी आरोप केला की निर्मात्यांनी त्यांच्या ‘कबहु ना छाडे खेत’ या साहित्यकृतीच्या कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे.
न्यायमूर्ती यांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या आदेशात नमूद केले की हा चित्रपट गेल्या महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि शुक्रवारी हा चित्रपट OTT वर प्रदर्शित करण्याची योजना आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांमध्ये समतोल साधण्यासाठी, 22 ऑगस्टपर्यंत निर्मात्यांनी 1 कोटी रुपये जमा करून OTT वर चित्रपट प्रदर्शित केलं तर ते योग्य ठरेल.
न्यायालयानं सांगितलं की, जर ही रक्कम वेळेत जमा न केल्यास, 23 ऑगस्टपासून OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपटाच्या पुढील प्रसारणावर बंदी लावण्यात येईल.