मुंबई :अभिनेत्री श्रीदेवीचा आवडता रंग हा पांढरा रंग होता. अनेकदा श्रीदेवीचे साडी, ड्रेस हे पांढऱ्या रंगाचे असायचे. इतकंच नाही तर साडी नेसल्यावर पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा श्रीदेवी कायम माळायची.
'झी मराठी'वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला येतानाही श्रीदेवीने पैठणीवर मोगऱ्याचा गजरा घातलेला. त्यामुळे श्रीदेवी मोगरा फुलांची आणि पांढऱ्या रंगाची आवड होती. त्यामुळे तिच्या इच्छेप्रमाणेच पांढऱ्या शुभ्र रंगात आणि मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेल्या गाडीने श्रीदेवीला निरोप देण्यात येणार आहे.
श्रीदेवी यांच्या निधनामुळं बॉलिवूडला जोरदार सदमा बसलाय. श्रीदेवीच्या निधनामुळं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून, यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय बॉलिवूडनं घेतला असल्याचं समजतं. दरम्यान, बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी मुंबईतील अनिल कपूर यांच्या निवासस्थानी जाऊन कपूर कुटुंबियांचे सांत्वन केलं.
माधुरी दीक्षित-नेने, जयाप्रदा, फरहान अख्तर, तब्बू, व्यंकटेश, सरोज खान, अमर सिंग यांनी अनिल कपूर यांच्या निवासस्थानी भेट दिली. ग्रीन एकर्स या अंधेरीतील अपार्टमेंटमध्ये श्रीदेवी कुटुंबीय राहतात. मात्र सध्या त्यांचे सर्व नातेवाईक अनिल कपूर यांच्या घरी एकत्र आलेत.