मुंबई: चॅम्पियन बॅडमिंटनपटू सायना नेहवाल बायोपिकचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनापेक्षा अजून चांगली संधी काय? या सिनेमात सायनाचा पराभव, विजय, धैर्य आणि उत्कटते विषयी कथा मांडण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत दिसत आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट 26 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. परिणीतीने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करत, 'महिला दिनाच्या दिवशी 'सायना' सिनेमाचा ट्रेलर रीलिज केल्यामुळे मला गर्व वाटत आहे.' असं कॅप्शन दिलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे सिनेमात सायनाच्या प्रशिक्षकाची भुमिका पी. गोपीचंद साकारत आहेत. शुभराज्यती बारात आणि मेघना मलिक सायनाच्या पालकांची भूमिका साकारणार आहेत. बॅडमिंटन अॅकॅडमीमध्ये सायनाच्या प्रवेशासह ट्रेलरची सुरुवात होते. यशस्वी होण्यासाठी मार्गनिवडण्याचा नाही तर मार्ग बनावयचा असतो, असा सल्ला सायनाच्या आईने तिला दिला आणि आईचा हाच सल्ला तिच्या आयुष्यात फार मोलाचा ठरला असल्याचं देखील सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
कोरोना महामारीनंतर परिणीतीचा 'सायना' सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सायना सिनेमाच्या ट्रेलरला आतापर्यंत 25 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. 2 मिनिटं 48 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये फक्त चांगले डायलॉग्सच नाही तर सीन्स देखील फार चांगले आहेत.