मुंबई : सिद्धू मूसेवालाच्या मृत्यूनंतर आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा वाढवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार सलमानच्या वैयक्तिक सुरक्षेसोबतच बाहेरील पोलिसांची सुरक्षाही वाढवण्यात आल्याचं समोर येत आहे. सिद्धूच्या हत्येनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सलमानला मिळााली होती धमकी
सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले आहे. याप्रकरणी पोलीस लॉरेन्सची चौकशी करत आहेत. लॉरेन्स हा तोच गँगस्टर आहे ज्याने 2018 मध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सिद्धूच्या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोईचं नाव आल्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सलमानला का दिली होती लॉरेन्सने धमकी
सलमान खानवर काळवीट मारल्याचा खटला सुरू आहे. राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा सलमानवर आरोप आहे. 2008 मध्ये लॉरेन्सने या प्रकरणी जोधपूरमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता पुन्हा त्याचं नाव समोर आल्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने तुरुंगात राहून या संपूर्ण हत्येचा कट रचला असल्याचं, जाणकारांचं मत आहे. याबद्दल अद्याप ठोस पुरावा समोर आलेला नाही. पोलीस सध्या याप्रकरणी कसून चौकशी करत आहे.