मुंबई : छोट्या पडद्यावर असो किंवा मोठ्या पडद्यावर रिलेशनशिप किंवा मग लग्न मोडणं काही मोठी गोष्ट नाही. अनेकदा सेलिब्रिटींच्या ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या सुरुच असतात. सध्या छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सना अमीन शेखही (Sana Amin Sheikh) तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सना अमीन शेखच्या वैवाहिक जीवनात खळबळ उडाली आहे. सना तिच्या पतीला घटस्फोट देणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. सनाने लग्नाच्या 6 वर्षानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा खुलासा खुद्द सनाने केला आहे. (Sana Amin Sheikh Divorce After 6 Years)
'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सना म्हणाली, 'पहिल्या भेटीनंतर एका महिन्यातच आमचं लग्न झालं. आम्ही दोघे छोट्या पडद्यावर काम करतो. आमच्याकडे वेळ कमी होता. मला निकाहच्या दुसऱ्याच दिवशी शूटिंगला जायचं होतं. त्याचवेळी एजाज (Aijaz Sheikh) एका टीव्ही शोचे दिग्दर्शनही करत होता. आम्हा दोघांचं बॅकग्राऊंड खूप वेगळं होतं. त्यामुळे आमचं लग्न फार काळ टिकू शकले नाही.'
सना पुढे म्हणाली, 'मला माझ्या तुटलेल्या लग्नाबद्दल सगळ्यां समोर बोलायचे नाही. लोक त्यांचं लग्न वाचवण्याचा प्रयत्न यासाठी करतात कारण त्यांना जगाची भीती सतावते. लग्नाच्या 6 वर्षात मी एक गोष्ट शिकले की तुम्ही आनंदी नसाल तर नात्याला काही अर्थ नाही. आम्ही एका छताखाली सुखानं जगू शकलो नाही. आमचं लग्न वाचवण्याचा कोणताही मार्ग नव्हता.' ( Sana Amin Sheikh parted ways from Husband Aijaz Sheikh Got Divorce)
पुढे सना म्हणाली, 'मी माझं लग्न वाचवण्यासाठी 6 वर्षे दिली. तरीही मी माझं नातं वाचवू शकलो नाही. त्यामुळे आम्ही एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. आता आम्ही अधिकृतपणे विभक्त झालो आहोत. घटस्फोटानंतरही आम्ही चांगले मित्र राहू. लग्न मोडल्यानंतर आता मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मला लवकरच OTT साठी काम करायचे आहे.'