दिल्ली : दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत. आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,964 नवीन रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मात्र, गेल्या 24 तासांत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,939 झाली आहे. तर दिल्लीत कोरोनाचे एकूण एक्टिव्ह रुग्ण 6,826 आहेत. कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट 9.42% आहे.
बुधवारीही 1600 हून अधिक कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने बुधवारी माहिती दिली की, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 1652 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. Omicron चे BA.4 आणि BA.5 सब-व्हेरिएंट राजधानीत सक्रिय झाल्यानंतर प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झालीये.
दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाचे 1201 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासात BA 2.75 प्रकार आढळून आला. दरम्यान हा अधिक वेगाने पसरत असल्याचं लक्षात आलंय. बुधवारी दिल्लीत कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट 9.92% होता. तर मंगळवारी दिल्लीत कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट 19.20% नोंदवला गेला.
दरम्यान, दिल्ली-एनसीआर कोरोनामध्ये व्हायरल फिव्हर आणि फ्लूनेही डोकं वर काढल्याचं दिसतंय, असं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. सर्वेक्षणानुसार, गेल्या 30 दिवसांत 10 पैकी 8 घरं कोविड किंवा व्हायरल ताप किंवा फ्लूच्या विळख्यात आली आहेत.