मुंबई : हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो.
कारण पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. मांस न खाणाऱ्या अनेक लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. मग जरा विस्ताराने जाणून घ्या पनीरचे आरोग्यदायी फायदे
प्रोटिनचा सर्वोत्तम स्रोत
काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते.
भुकेवर नियंत्रण राहते
पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.
दात मजबूत होतात
पनीरमध्ये प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.
फॅट्स बर्न होण्यास मदत होते
प्रोटिन आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
घातक आजारांपासून लांब ठेवते
कॅन्सर, हृदय विकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट्स जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.
पनीर शरीरासाठी पोषक असले तरी त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांबाबत काही मतभेद आहेत. काही लोकांच्या मते, पनीरमुळे वजन वाढत असल्याने ते खाऊ नये. 100 ग्रॅम पनीरमधून 292 ग्रॅम कॅलरी मिळतात हे खरे असले, तरी कष्टाची कामे करणाऱ्या लोकांनी पनीर खाल्ल्यास त्यातील कॅलरी सहज बर्न होऊन त्यांना पोषक घटक मिळू शकतात. म्हणून पनीर प्रमाणात खावे, अतिजास्त खाऊ नये किंवा खाणे टाळूही नये.
कच्चे पनीरही चवीला स्वादिष्ट असते. त्यावर काळी मिरी आणि मीठ भुरभुरून खाल्यास चव चांगली येते. मात्र तुम्हांला पनीर मसाला किंवा पनीरचा कोणताही पदार्थ करायचा असेल तर त्यासाठी पनीर तळून घेऊ नका.