मुंबई : काही लोकांना उशी शिवाय झोपण्याची सवय असते तर काहींना उशी न घेता झोपच येत नाही.
अर्थात ही सवय प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असू शकते.निरनिराळ्या व्यक्तीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या उशा योग्य असतात.त्यामुळे सहाजिकच तुमच्या मनात आम्ही कोणती उशी वापरावी व अयोग्य उशीमुळे नेमकी काय समस्या होते ? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.यासाठी जाणून घ्या म्हणूनच उशीची निवड कशी करावी यावर मुंबईतील स्पेशलिटी इएनटी हॉस्पिटलचे इएनटी सर्जन अॅन्ड स्लीप अॅप्निया स्पेशलिस्टडॉ.विकास अग्रवाल यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
योग्य उशी का महत्वाची असते?
शांत झोप लागण्यासाठी व श्वसन कार्य सुरळीत चालण्यासाठी तुम्ही योग्य स्थितीत झोपणे गरजेचे असते.झोपताना मान ताठ असेल तर तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य होतो. पण जेव्हा तुम्ही अयोग्य उशी घेता तेव्हा तुमच्या मानेला आधार मिळत नाही.ज्यामुळे श्वसनमार्गात अडथळा येतो व तुम्हाला स्लीप अॅप्निया अथवा घोरण्याची समस्या निर्माण होते.यासाठी झोपताना योग्य प्रकारची उशी निवडा.उशी अगदी मऊ नसावी किंवा खूप कडक देखील नसावी.तसेच तिचा आकार देखील खूप पातळ अथवा खूप जाड नसावा.जर तुम्हाला स्लीप अॅप्निया अथवा घोरण्याची समस्या असेल तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेली अॅन्टी-स्नॉरींग पिलो देखील खरेदी करु शकता ज्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळेल.
जाणून घ्या आरामदायी झोपेसाठी कशी कराल उशीची निवड ?
तुमच्या खांद्याची रुंदी लक्षात घ्या-
जेवढा तुमचा खांदा रुंद असेल तेवढी रुंद व लांब उशी तुमच्यासाठी योग्य ठरेल.पुरुषांचे खांदे स्त्रीयांपेक्षा अधिक रुंद असतात त्यामुळे त्यांना स्त्रीयांपेक्षा मोठी उशी गरजेची असते.त्यामुळे योग्य स्थितीत झोपण्यासाठी या उशीमुळे तुमच्या खांदे व डोक्यामधील पोकळी भरुन निघेल.
उशीमधील मऊ व टणकपणा-
तुमची उशी अधिक मऊ व अधिक कडक नसेल याची जरुर काळजी घ्या.कारण जास्त मऊ उशीमुळे तुमच्या मानेला योग्य आधार न मिळाल्यामुळे तुमची झोपण्याची स्थिती बिघडून सकाळी उठल्यावर तुम्हाला मानदुखीचा त्रास होऊ शकतो.तसेच जास्त कडक उशीमुळे तुमच्या डोक्यावर जास्त दाब येतो व मानेला देखील त्रास होतो.यासाठी मध्यम मऊ-टणक असलेली उशी निवडा.
उशीचे कापड-
यासाठी सिन्थेंटीक अथवा नायलॉन उशी पेक्षा सुती कापडाची उशी निवडा कारण त्यामुळे तुम्हाला श्वास घेणे सोपे जाईल व थंडावा देखील मिळेल.मात्र असे असले तरी डॉ.अग्रवाल यांच्या मते उशीच्या सुती कापडामुळे अनेकांना अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो यासाठी तुम्ही फायबरचा वापर करु शकता.
उशीची जाडी-
जर उशी खूपच जाड असेल तर तुमची हनुवटी छातीच्या दिशेला झुकून मानेवर अधिक ताण येईल.यामुळे तुम्हाला गंभीर मानदुखीची समस्या तर होईलच शिवाय स्लीप अॅप्निया अथवा घोरण्याचा त्रास देखील होईल.त्याचप्रमाणे जर उशी खूपच कमी जाडीची असेल तर त्यामुळे तुम्हाला श्वसनमार्गात अडथळा येईल व घोरण्यासोबत झोप देखील चांगली लागणार नाही.
झोपताना पाठीवर झोपावे की कुशीवर झोपावे?
डॉ.अग्रवाल यांच्यामते पाठीवर झोपण्यापेक्षा कुशीवर झोपणे हे नेहमीच आरोग्यासाठी हितकारक असते.कारण जेव्हा तुम्ही कुशीवर झोपता तेव्हा तुमची मान ताठ रहाते व तुमच्या श्वसनमार्ग खुला रहातो त्यामुळे तुम्हाला झोपल्यावरही पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो.पण जर तुम्ही पाठीवर झोपला तर झोपेत तुमची जीभ पाठच्या दिशेने झुकते व तुम्हाला घोरण्याची समस्या निर्माण होते.त्याचप्रमाणे नेहमी कुशीवर झोपल्याने तुमचे पचन देखील चांगले होते.