मधुमेहींसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

मधुमेह रुग्णांसाठी आहार हा फार महत्त्वाचा घटक असतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्याचा परिणाम हृदय, किडनी, आणि डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे आहार निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे.  शेंगदाण्यांच्या फायदे-तोट्यांबद्दल अधिक जाणून घेऊया.   

Intern | Updated: Dec 8, 2024, 03:46 PM IST
मधुमेहींसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या सविस्तर title=

शेंगदाणे आपल्या आहाराचा भाग आहे. हे सहज उपलब्ध आणि परवडणारे असून अनेक प्रकारे वापरले जातात. उकडलेले शेंगदाणे, भाजीत वापरण्यात येणारा शेंगदाण्याचा कूट, पीनट बटर किंवा फोडणीत घालण्यासही शेंगदाण्याचा उपयोग होतो. मात्र मधुमेहींना नेहमीच प्रश्न पडतो की, शेंगदाणे खाणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? आणि जर खाल्ले तर किती प्रमाणात खावे?  
 
शेंगदाण्यामधील पोषक घटक
शेंगदाणे हे पोषणमूल्यांनी परिपूर्ण आहेत. त्यात फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स, तसेच व्हिटॅमिन बी 6 आणि बी 9 मुबलक प्रमाणात असते. या पोषक घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील अनेक कार्ये सुरळीत होतात.  
1. फायबर: फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.  
2. प्रथिने: प्रथिने स्नायू बळकट ठेवतात आणि शरीराला ऊर्जा देतात.  
3. मॅग्नेशियम: मधुमेहींसाठी मॅग्नेशियम फायदेशीर आहे, कारण ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात मदत करते.  
4. अँटीऑक्सिडंट्स : शरीराला हानीकारक विषारी घटकांपासून संरक्षण मिळते.  

मधुमेहींसाठी शेंगदाणे फायदेशीर का?  
शेंगदाणे मधुमेहींसाठी सुरक्षित आणि फायदेशीर मानले जातात.  सकाळी उपाशीपोटी शेंगदाणे खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. हे मधुमेहींसाठी खूप फायदेशीर ठरते.  
मधुमेहामुळे हृदयविकाराचा धोका अधिक असतो. शेंगदाण्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स व चांगले कोलेस्ट्रॉल हृदयासाठी उपयुक्त ठरतात. फायबर आणि प्रथिनांनी भरपूर असल्याने शेंगदाणे खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे जास्त खाण्याची सवय कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.  

मधुमेहींसाठी शेंगदाणे कसे खावेत?
1. प्रमाण ठरवा:  कोणताही पदार्थ प्रमाणात खाल्ल्यास त्याचा फायदा होतो. शेंगदाण्यांचे प्रमाण एका दिवसात 30-40 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे.  
2. पीनट बटर निवडताना काळजी घ्या:  बाजारातील पीनट बटरमध्ये साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे नैसर्गिक पीनट बटरचा वापर करा.  
3. सकाळी खाणे अधिक फायदेशीर:  सकाळी उपाशीपोटी शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि साखरेची पातळी स्थिर राहते.  

ज्यांना शेंगदाण्यांची ऍलर्जी आहे त्यांनी काय करावे?
शेंगदाण्यांना ऍलर्जी असलेल्या लोकांनी त्याचा पूर्णपणे त्याग करावा. अ‍ॅलर्जी असल्यास त्वचेवर पुरळ, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर गंभीर लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही .कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)