मुंबई : आपल्यापैकी अनेकांची चहाशिवाय दिवसाची सुरुवात होताना दिसत नाही असे असंख्य लोक आहेत. चहा हे अनेकांचे सकाळचं आवडतं पेय आहे. चहा प्यायल्याने उत्साही वाटतं. काही लोकांना चहाचं इतका वेड असतं की, हे लोक दिवसातून 4 ते 5 कप किंवा त्यापेक्षा जास्त चहा पितात. तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दुधाच्या चहाने वजन वाढते. चहा आणि वजन वाढ याबाबत अनेक समज गैरसमज आहे. मात्र खरंच चहा प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या
चहा बनवताना दूध आणि साखरेचा वापर केला जातो. कारण दुधाशिवाय चहा अपूर्ण आहे. पण हे दोन्ही घटक वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अनेक जण जास्त दुधाचा चहा घेणं पसंत करतात. यासाठी जास्त फॅट असलेलं दूध वापरण्याचा देखील काहींचा आग्रह असतो. जास्त फॅट असलेल्या दुधाचा चहा प्यायला तर शरीरातील चरबी आणि वजनही वाढतं.
सामान्य दुधाच्या चहामध्ये अर्धा चमचा जरी साखर घालून रोज चहा प्यायल्यास तुमचं वजन वर्षाला एक किलोने वाढू शकते. तुम्ही दररोज 2 ते 3 कप चहा प्यायलात तर तुमचं वजन वाढू शकते. याचाच अर्थ हे सर्व चहात वापरल्या जाणार्या घटकांवर अवलंबून असतं.
साखरेच्या गोडव्याशिवाय चहा अपूर्ण आहे. मात्र आरोग्यासाठी चहामध्ये साखरेचा वापर टाळावा किंवा फारच कमी प्रमाणात वापर करा. तसेच जर तुम्ही चहामध्ये काही कृत्रिम गोष्टीचा वापर करत असाल तर ते प्रमाण देखील कमी करा. त्या ऐवजी तुम्ही चहामध्ये मध, गूळ वापरू शकता. चहा बनवताना कमी फॅटच दूध वापर करा आणि दुधाच्या पावडरचा वापर टाळा.