मुंबई : पूरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. झोप जितकी महत्वपूर्ण आहे तितकचं महत्वाची आहे तुमच्या झोपण्याची स्थिती. योग्य पद्धतीने झोपणं किती लाभदायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कामाचा व्याप, ताण-तणाव, प्रवास या सर्वांमुळे आपण त्रस्त झालेलो असतो. त्यामुळे किमान ८ तास झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. झोप नीट झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर होण्यास सुरुवात होते.
झोपेमध्ये आपण आपल्या सोयीनुसार स्थिती बदलतो. मात्र, डाव्या कुशीवर झोपल्याने शरीराला अनेक फायदे होतात हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. चला तर मग पाहूयात डाव्या कुशीवर झोपण्याचे काय आहेत फायदे...
डाव्या कुशीवर झोपल्याने शारीरिक स्वास्थ्य खूपच चांगले राहते. डाव्या बाजूला झोपण्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. यामुळे आपल्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. पचनप्रक्रिया सुरळीत होते. अन्न पचन सुरळीत होऊन सकाळी पोट साफ होते आणि शरीरही निरोगी राहतं.
गरोदर महिलांनी डाव्या कुशीवर झोपणं खुपच चांगलं असतं. यामुळे गर्भावर वाईट परिणाम होत नाही. तसेच हात किंवा पाय सूजन्याची समस्या निर्माण होत नाही. थकवा जाणवत नाही आणि पोटाच्या संबंधीत कुठलीही समस्या जाणवत नाही.