मुंबई : आपली संस्कृती अनेक सणांनी आणि परंपरांनी समृद्ध आहे. या सणांमागे नक्कीच काही विशेष उद्देश आहे. ऋतुमानानुसार वातावरणात, शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी हे सण अनुरूप ठरतात. पूर्वीच्या स्त्रिया सणाला जोडल्या गेलेल्या धार्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेऊन पूजा करत असतं. आजकालच्या नवीन, शिकलेल्या पिढीला ते जुनाट, भूरसटलेले वाटते. पण आपण जर सणांमागील शास्त्रीय कारण जाणून घेतली तर आपल्याला देखील सणांचे महत्त्व पटेल. तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेचे महत्त्व...
# वटपौर्णिमा ही पावसाळ्यात येते आणि या काळात आजारांचे प्रमाण वाढते. म्हणून आजरांपासून दूर राहण्यासाठी मनाशी आरोग्यदायी संकल्प करणं आवश्यक असतं. हा संकल्प वटपौर्णिमेच्या पूजेतून काहीसा साध्य करता येतो.
# वडाचे झाड २४ तास ऑक्सिजन देते. त्यामुळे पूर्वी कधीच बाहेर न पडणाऱ्या स्त्रियांना पूजेनिमित्त काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात राहता येते. त्यामुळे त्यांना पुरेसा ऑक्सिजन व ताजी हवा मिळते. परिणामी त्यांना फ्रेश, चैतन्नमय वाटते. आजकाल स्त्रिया इतक्या व्यस्त झाल्या आहेत की निसर्गाचा उपभोग त्यांना घेता येत नाही. अशावेळी वटपौर्णिमेचे निमित्त साधून त्या निसर्गाच्या सानिध्यात राहतात.
# स्त्रीच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा खूप उपयोग होतो. Reproductive tract infection आणि योनीमार्गातील इन्फेकशन दूर करण्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग होतो.
# वडाच्या पारंब्या या केसवाढीसाठी उपयुक्त असतात.
# त्याचबरोबर नातेसंबंध जपण्यासाठी वडाचं झाड हे प्रतिकात्मक आहे. वडाच्या झाडाला अनेक फांद्या असून त्याची मूळ खोलवर जातात. अनेक फांद्यांना सांभाळत, मातीशी घट्ट नातं जोडून ते झाड वर्षानुवर्षे टिकून राहतं. स्त्री ने देखील आपली नाती अशीच सांभाळावी, असा संदेश हे झाड देत असतं.
# आजकाल नातेसंबंधातील तणाव, नैराश्य वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सुसंवादाचा अभाव हे आहे. अनेक स्त्रिया एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण होते. सुसंवाद साधला जातो. त्यामुळे ताण दूर होण्यास नक्कीच मदत होते. म्हणून घरात फांदी आणून त्याची पूजा न करता वडाजवळ जाणं, सर्व स्त्रियांना एकत्रित करून पूजा करणं महत्त्वाचं.
# प्रत्येक सणाला धार्मिक गोष्टीची जोड आहे आणि त्यातून मिळणारा संदेश प्रतिकात्मक आहे. वडाच्या झाडाखाली सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले. त्याची आठवण म्हणून वडाची पूजा करतात. परंतु, स्त्री खंबीरपणे उभी राहिली तर ती पतीच्या आरोग्याबरोबर त्याच्या भरभराटीचे कारण होऊ शकते. संसारात त्याला आधार देऊ शकते.
# पतीचे आयुष्य गुणवत्तामय होण्यासाठी स्त्रीने आपल्या संसारात चैतन्नमय, जागरूक, ऊर्जावान राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी तिचं आरोग्य उत्तम असणं आवश्यक आहे. वट हा स्त्रीसाठी आरोग्यवर्धक आहे. म्हणून ‘स्त्री आरोग्य’ हा वटपौर्णिमेचा गाभा आहे.
# स्त्रीच्या आरोग्यरूपी चैतन्न्यातून पतीला प्राण मिळतात.
# निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यास त्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.