Viral News: आपला मोबाइल सर्वांनाच प्रिय असतो. जर तोच मोबाइल हरवला तर आपण तो शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. मोबाइल नंबरपासून ते अनेक महत्त्वाच्या गोष्टी या मोबाइलमध्ये असतात. आजकाल तर हा मोबाइल म्हणजे मुलभूत गरजच झाली आहे. पण जेव्हा तुम्ही एका सरकारी पदावर असता तेव्हा मात्र तुमच्या प्राथमिकता बदलतात. तेव्हा तुम्ही अनेक निर्णय घेताना आधी जनतेचा आणि नंतर स्वत:चा विचार करणं अपेक्षित असतं. पण छत्तीसगडमध्ये एका अधिकाऱ्याने आपला हरवलेला मोबाइल शोधण्यासाठी शेतीसाठी लागणारं तब्बल 21 लाख लीटर पाणी उपसून बाहेर काढल्याची अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर या अधिकाऱ्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
Koyalibeda ब्लॉकचे अन्न निरीक्षक राजेश विश्वास हे सुट्टी घालवण्यासाठी खेरकट्टा परळकोट जलाशयावर आले होते. यावेळी त्यांच्याकडून 96,000 किंमतीचा Samsung S23 फोन 15 फूट खोल पाण्यात पडला. यानंतर घाबरलेल्या विश्वास यांनी सिंचन विभागाकडे धाव घेतली आणि आपला पाण्यात बुडालेला मोबाइल पुन्हा कसा मिळवू शकतो याच्या पर्यायांची चर्चा सुरु केली आहे. अखेरीस, जलाशयातील पाण्याचा निचरा करण्यासाठी 30-हॉर्स पॉवर पंप तैनात करण्यात आला. त्यामुळे सिंचनासाठी साठवण्यात आलेलं हे पाणी वाया गेलं.
एका दिवसात तब्बल 21 लाख लीटर पाणी बाहेर काढण्यात आलं. तीन दिवस हा सगळा प्रकार सुरु होता. तीन दिवस कर्मचारी पाण्याचा उपसा करत होते. तब्बल 41,104 घनमीटर पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर तीन दिवसांनी फोन सापडला. पण यावेळी जितकं पाणी वाया गेलं, ते पाणी सुमारे 1,500 एकर जमीन सिंचनासाठी झाला असता.
तीन दिवस पाण्यात असल्याने विश्वास यांचा फोन बंद पडला होता. दुसरीकडे पाणी उपसून बाहेर काढल्याने पाण्याची पातळी 10 फूटांनी कमी झाली होती.
इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारं पाणी वाया घालवल्याने टीका होऊ लागल्यानंतर राजेश विश्वास यांनी अजब उत्तर दिलं आहे. जे पाणी बाहेर काढण्यात आलं, ते सिंचनासाठी योग्य नव्हतं असा दावा त्यांनी केला आहे. आपल्या मोबाइलमध्ये अनेक महत्वाचे नंबर असल्याने तो शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असंही त्यांचं म्हणणं आहे. तसंच आपला स्वत:चा मोबाइल असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
"कांकेर पाटबंधारे विभागाच्या एसडीओने 3 ते 4 फूट पाणी काढण्यासाठी तोंडी परवानगी दिली होती. हा धरणाचा भाग होता जिथे सांडपाणी ठेवले जात होते, जे सिंचनासाठी अयोग्य होते. डिझेल पंपाने पाणी रिकामे करण्यात आले. यासाठी 7 ते 8 हजारांचा खर्च आला आहे. माझ्या कृतीमुळे कोणताही शेतकरी बाधित झाला नाही," असा दावा राजेश विश्वास यांनी केला आहे.
Kanker, Chhattisgarh | Food inspector suspended for wasting 21 lakh litres of water from Kherkatta dam to find his mobile phone
I got information about this matter through sources & media reports that a food inspector of Pakhanjur, Rajesh Vishwas had gone for a picnic near… pic.twitter.com/Z4K1KE8jjA
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 26, 2023
दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर शुक्रवारी राजेश विश्वास यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
जलसंपदा विभागाचे उपाधिकारी राम लाल धिवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 फूट खोलीपर्यंत पाणी उपसण्याची तोंडी परवानगी देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत पाण्याची पातळी 10 फुटांपेक्षा जास्त कमी झाली आहे.
अधिकारी सिंचनावर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन करत आहेत. तसंच वाया गेलेल्या पाण्याची भरपाई करण्यासाठी उपाययोजनांवर विचार करत आहेत. उत्तर आणि मध्य भारतात उन्हाच्या झळा बसत अताना आणि सिंचनाच्या पाण्याची कमतरता जाणवत असतानाच हा प्रकार घडला असल्याचं ते म्हणाले आहेत.