नवी दिल्ली : संपूर्ण जगभरात तणावाची परिस्थिती उभी करणाऱ्या Coronavirus कोरोना विषाणूने भारतातही अशीच काहीशी परिस्थिती उदभवली आहे. जवळपास दोन महिन्यांपासून कोरोनाशी भारतीयांची झुंज सुरु आहेत. पण, तरीही या विषाणूचा जीवघेणा संसर्ग रोखण्यात मात्र समाधानकारक यश आलेलं दिसत नाही. त्यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार जवळपास ६० टक्के कोरोनाबाधित रुग्ण हे देशाच्या काही ठराविक शहरांमध्ये आढळले आहेत.
ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, गुजरात (अहमदाबाद) अशा ठिकाणीच ४२ टक्के कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्य शासनांकडूनच सादर करण्यात येणाऱ्या आकडेवारीनुसार ७ मे पर्यंत देशाच्या कोरोनाबाधितांमध्ये मुंबईतून २१.४० टक्के रुग्ण आढळले आहेत. तर, त्यामागोमाग, दिल्ली (११.२९ टक्के) आणि अहमदाबाद (९.४२ टक्के) यांचा समावेश आहे.
कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक परिस्थितीमध्ये असणाऱ्या इतर शहरांमध्ये पुणे आणि ठाण्याचा समावेश आहे. ज्याठिकाणी अनुक्रमे ४.९२ आणि २.३२ टक्के इतके रुग्ण आढळले आहेत. मध्ये प्रदेशमधील इंदुर (३.२६ टक्के), तामिळनाडूतील चेन्नई (२.४७ टक्के) आणि राजस्थानमधील जयपूर येथे (२.१ टक्के) इतक्या प्रमाणात कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळले.
कोरोनाचा संसर्ग अतिशय झपाट्यानं होत असतानाच चेन्नई (सहा दिवस), ठाणे ( सात दिवस) आणि पुणे (आठ दिवस) येथे मात्र रुग्णसंख्येत दुपटीने वाढ होण्याचं प्रमाण हे काही अंशी कमी दिसून येत आहे. तर मुंबई, दिल्ली, जयपूर, इंदुर आणि अहमदाबाद या शहरांमध्ये मात्र रुग्णांची वेगाने वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
केरळमध्ये कोरोना बाधितांच्या उपचारांसोबतच येथे या विषाणूचा संसर्ग काही अंशी नियंत्रणात आणला गेल्याचं पाहायला मिळत असल्याची बाब समोर आली आहे. तर, उत्तर पूर्व भारतात असणाऱ्या त्रिपुरा, आसाम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम येथेसुद्धा कोरोना नियंत्रणात असल्याची दिलासादायक बाब समोर येत आहे. तर, नागालँड आणि सिक्कीम येथे कोरोना रुग्णच आढळलेले नसल्यामुळे ही अतिशय समाधानकारक बाब साऱ्या देशाचं लक्ष वेधत आहे.