नवी दिल्ली : कोरोना संकटासाठी बनवला गेलेला पंतप्रधान सहायता निधी कुठे खर्च झाला ? याची माहिती जनतेला कळायला हवी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. हा पैसा कुठे, कसा खर्च झाला याचे तपशील त्यांनी मागितले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
पंतप्रधान सहायता निधीचे ऑडीट होणं गरजेचं आहे. यासाठी किती निधी आला ? यातील किती निधी खर्च झाला ? याची माहिती जनतेला कळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आरोग्य सेतू एपचा सोर्स खुला करण्याबद्दलही ते म्हणाले.
केंद्र सरकारने लॉकडाऊननंतर देश कसा सुरु करायचा, याची नीट आखणी केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. राहुल गांधी यांनी म्हटले की, लॉकडाऊन म्हणजे एखादा ऑन-ऑफ स्विच नव्हे. त्यामुळे आता लॉकडाऊनंतर देशात काय करायचे, याचे नियोजन सरकारने केले पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे सरकारने आपल्या कारभारात पारदर्शकता आणायला पाहिजे. लोकांना सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगायला हव्यात. तसेच निर्णय घेताना केंद्रीकरण टाळले पाहिजे, असे राहुल यांनी सांगितले.
सर्वप्रथम या लॉकडाऊनची मोठी झळ बसलेल्या लोकांना तात्काळ मदत पुरविली पाहिजे. अन्यथा आपण काहीच करु शकणार नाही. काँग्रेसने आखलेल्या न्याय योजनेप्रमाणे या लोकांच्या बँक खात्यांमध्ये तात्काळ पैसे जमा केले पाहिजेत. स्थलांतरित कामगार, गरीब आणि लघुद्योगांना आजच आर्थिक मदत केली पाहिजे.
नंतर वेळ निघून गेल्यावर मदत करून काही फायदा होणार नाही. कारण, या उद्योगांना आर्थिक मदत न केल्यास देशात बेरोजगारीची त्सुनामी येईल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.