रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : पुढील काही दिवसांत शिवसेनेत (Shivsena) आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना फोडण्याचं मोठं षडयंत्र केलं जात असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलाय. तीन खासदारांना ईडीची (ED) चौकशीची भीती दाखवली जात असल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केलाय.
शिवसेनेचे खासदार दिल्लीकरांच्या दबावाखाली असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. कोण कोणाला भेटतो, कोण काय बोलतो याची प्रत्येक गोष्ट आमच्या कानावर येत असते. काही जणांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे, आमच्यावर दिल्लीवर दबाव आणला जात आहे, असा गौप्यस्फोटही विनायक राऊत यांनी केला आहे.
काही जणांवर चौकश्यांचा दबाव टाकला जात आहे, काही जणांवर ईडीचा दबाव टाकला जात आहे, आयटीचा दबाव आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून या लोकप्रतिनिधींवर दबाव टाकले जात आहेत असा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे.
आमदारांपर्यंत 50 खोके भाव सुरु होता, आता खासदारांसाठी आणखी 10 खोक्यांनी भाव वाढलेला आहे, असा गौप्यस्फोटही विनायक राऊत यांनी केला.
संसदेसाठी शिवसेनेच्या सर्वा खासदारांना व्हिप बजावला आहे आणि खासदारांनीही व्हिप स्विकारला आहे, अशी माहितीही विनायक राऊत यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मोडीत काढायची, उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं, असा कुटील डाव सुरु असून त्याला काही जण बळी पडत आहेत, आमच्या सारखे प्रामाणिक कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत मरेपर्यंत रहाणार हे निश्चित असल्याचंही विनायक राऊत यांनी सांगितलं.