नवी दिल्ली : बडोदा (Badoda), वाराणसी (Varanasi) आणि आता रामनाथपुरम (Ramanathapuram). 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासाठी नवा मतदारसंघ भाजपच्या (BJP) चाणक्यांनी शोधलाय. अयोध्येत भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) निर्माण करण्याचं स्वप्न मोदींनी जवळपास साकार केलं. आता भगवान श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेला रामसेतू जिथं आहे, अशा तमिळनाडूमधील (Tamil Nadu) रामनाथपुरम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची योजना टीम मोदीच्या विचाराधीन आहे.
2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक?
रामनाथपुरम हे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) यांचं जन्मस्थान असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तमिळनाडूतील महत्त्वाचं देवस्थान आहे. 14 जानेवारी 2024 ला अयोध्या (Ayodhya) राममंदिराचं लोकार्पण करण्याची योजना आहे. त्यानंतर रामरथावर आरूढ होत रामनाथपुरमची जागा मोदी लढवणार असल्याचं समजतंय. या मतदारसंघातून भाजपला एकदाही विजय मिळालेला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. आता मुस्लीम बहुल अशा या मतदारसंघातून मोदींना विजयी करण्याचं प्लॅनिंग आहे.
2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मोदींनी पश्चिम आणि उत्तर भारत काबीज केला. आता दक्षिणेत डंका वाजवण्यासाठी मोदी सज्ज झालेत. 2024चं महायुद्ध जिंकण्यासाठी राममंदिर आणि रामनाथपुरम अशा नव्या राममार्गाची योजना हाती घेण्यात आलीय. दक्षिणेच्या मार्गानं दिल्ली जिंकण्याचा हा रामबाण उपाय यशस्वी होणार का, याकडं आता देशवासीयांच्या नजरा लागल्यात.
तामिळनाडूत भाजपचं मिशन निवडणूक
2019 च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. इतकंच काय तर भाजपाच्या तिकिटावर निवडणुकीत उभं राहिलेल्या केंद्रीय मंत्र्यांचाही पराभव झाला होता. पण आता 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने वेगळी रणनिती आखली आहे. तामिळनाडूमधल्या 6 जागांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. यात कोईम्बतूर, कन्याकुमारी, रामनाथपुरम, शिवगंगाई, थुथुकुडी आणि अंदमान निकोबार या जागांचा समावेश आहे.