मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हेच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झालंय... त्यामुळं नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी हा सामना आणखी रंगतदार होणाराय... राहुल गांधी हे खरंच मोदींना टक्कर देऊ शकतील?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय... काँग्रेस अध्यक्षपद मिळवल्यानंतर राहुल गांधी यांना आता देशाचं पंतप्रधान व्हायचंय... 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या तर तुम्ही पंतप्रधान बनणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला... तेव्हा नक्कीच... का नाही? असं उत्तर राहुल गांधींनी दिलं.
पहिल्यांदाच राहुल गांधींनी आपली पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवलीय... यानिमित्तानं त्यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिलंय. एवढंच नव्हे तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे खुनाचे आरोपी असल्याचा तिखट हल्ला त्यांनी चढवला. कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा हे भ्रष्टाचारी असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.
राहुल गांधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळं काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय... तर पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही, अशी सावध प्रतिक्रिया भाजपनं व्यक्त केलीय... तर शरद पवार हे पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, अशी भूमिका राष्ट्रवादीनं मांडलीय..
राहुल गांधींनी पंतप्रधानपदाच्या मुद्द्याला हात घालून खळबळ उडवून दिलीय. राष्ट्रवादीनं पवारांची उमेदवारी पुढं करून राहुल गांधींना खो घातलाय. त्यांच्या या दावेदारीला अन्य समविचारी राजकीय पक्ष साथ देतील का? मोदींच्या विरोधात अन्य राजकीय पक्षांची मोट बांधण्यात राहुल यांचं नेतृत्व यशस्वी होईल का? आणि राहुल गांधी खरंच मोदींना पर्याय ठरू शकतील का? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.