नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा काँग्रेसच्या निर्णयावर जाहीर केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आपला पाठिंबा देणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिवसेना नेते थोड्याच वेळात राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या भेटीत शिवसेनेकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.
शिवसेना नेते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याने राज्यपालांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यानंतर सोनिया गांधी यांनी प्रत्येक आमदारांशी फोनवरून चर्चा केली आहे. त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा कायम होता. तो आता सुटल्यात जमा आहे. भाजपने नकार दर्शविल्याने राज्यपालांनी शिवसेनेला विचारणा केली. त्यामुळे शिवसेनेकडे बहुमत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे राज्यातील तिढा सुटण्यासाठी आणि सत्ता स्थापन करण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनीही अहमद पटेल यांची भेट घेतली. त्यामुळे अंतिम निर्णय काँग्रेसचा होता. आता हा निर्णय आला आहे. काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात मोठा पक्ष भाजप असताना त्यांनी सरकार स्थापन करणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेत ५०-५० टक्के सत्तेत वाटा मिळण्यावरुन एकमत न झाल्याने तसेच भाजपने हा प्रस्ताव नसल्याचे म्हटल्याने युतीची चर्चा थांबली. शिवसेनासोबत येणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरकार स्थापन करण्याचा तिढा वाढला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेकडे सत्ता स्थापनेची विचारणा केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडे शिवेसनेने प्रस्ताव दिला आहे. तर काँग्रेसकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.