Viral Video: वाहन चालवताना आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पोलीस वारंवार करत असतात. पण यानंतरही अनेकजण रस्त्यावर स्टंट करताना दिसत असतात. सध्याचा सोशल मीडियाचा (Social Media) जमाना असल्याने हे व्हिडीओ मोबाइलवर शूट करत, व्हायरल करण्याचा प्रयत्न असतो. पण हे स्टंट करताना अनेकदा फजिती होते आणि ते व्हिडीओही व्हायरल (Viral Video) होतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत असून, थेट दिल्ली पोलिसांनीच व्हिडीओ ट्वीट (Tweet) केला आहे.
दिल्ली पोलिसांनी रस्त्यावर स्टंट करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ ट्विटरला (Twitter) शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना दिल्ली पोलिसांनी लोकांना गाडी चालवताना नियमांचं पालन करत सुरक्षितपणे वाहन चालवण्याचं आवाहन केलं आहे. याचं कारण या व्हिडीओत स्टंट करताना एक चूक होते आणि मागे बसलेली तरुणी धाडकन रस्त्यावर कोसळते.
28 सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये एक जोडपं दुचाकीवर स्टंट करताना दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतानाही हे जोडपं धोकादायक स्टंट करत होतं. तरुणाने बाईक पुढून वर उचलेली असताना मागे बसलेल्या तरुणीने त्याला घट्ट पकडलं होतं. पण काही वेळाने तरुणाचा तोल जातो आणि मागे बसलेली तरुणी धाडकन रस्त्यावरच पार्श्वभागावर कोसळते. दरम्यान, तरुण मात्र बाईक सावरताना दिसत आहे.
दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ ट्वीट करताना त्यासाठी 'जब वी मेट' मधील 'ये इश्क हाये' वापरलं आहे. तसंच कॅप्शन देताना लिहिलं आहे की, 'ये रिस्क हाये, बैठे बिठाये, हड्डिया तुडवाये'.
बेदरकारपणे गाडी चालवत 'जब वी मेट' #DriveSafe असं दिल्ली पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
JAB WE MET with an accident due to reckless driving.#DriveSafe@dtptraffic pic.twitter.com/adfwIPtHlX
— Delhi Police (@DelhiPolice) June 28, 2023
यानंतर सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा रंगली असून, अनेकांनी तो पाहिला आहे. तसंच अनेक युजर्सनी यावर कमेंट केली असून, दिल्ली पोलिसांनी चांगल्या प्रकारे संदेश दिल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर दिल्ली पोलिसांनी अशा चालकांवर कायमची बंदी आणली पाहिजे असं म्हटलं आहे.