Delhi Shahbad Dairy Murder Case: नवी दिल्लीमधील शाहबाद डेअरी परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीची निघृण हत्या केल्या प्रकरणी आरोपी साहिलला अटक करण्यात आली आहे. या तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपी लपून बसला होता. त्याने त्याच्या वडिलांना फोन केल्यानंतर त्याच आधारे त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आली. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती सोमवारी दिली. साहिलने फोन बंद करुन ठेवला होता आणि तो लपून बसला होता. त्याने फोन सुरु करुन वडिलांना फोन केला. त्यानंतर त्याच्यावर तांत्रिक टीमच्या मदतीने लक्ष ठेवण्यात आलं. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल हा बुलंदशहरामधील आपल्या एका नातेवाईकाकडे लपला होता.
तरुणीची हत्या केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये, आपला फोन ट्रेस होऊ नये म्हणून साहिलने फोन बंद करुन ठेवला होता. साहिल हा त्याच्या आत्याच्या घरी जाऊन लपला होता अशी माहिती बुलंदशहराचे अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) बजरंगबली चौरसिया यांनी दिली. साहिलला पहासू पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या अटरेना गावामधून अटक करण्यात आली.
हत्या करण्यात आलेल्या मुलीचे आणि साहिलचे प्रेमसंबंध होते. मात्र शनिवारी त्यांच्या कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. त्यानंतर ही मुलगी रविवारी सायंकाळी आपल्या मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्याच वेळी गर्दीच्या ठिकाणी साहिलने तिला गाठलं आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.
साहिलने या तरुणीला एका भिंतीवर ढकललं आणि त्यानंतर तिच्यावर चाकूने वारंवार हल्ले केले. एका वृत्तानुसार साहिलने या मुलीवर चाकूने 40 वेळा वार केला. त्यानंतर जवळच पडलेला मोठा दगड उचलून रक्तबंबाळ झालेल्या या मुलीच्या डोक्यात घातला. यानंतर साहिल फरार झाला. या सर्व घटनाक्रमाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मुलीच्या घरच्यांनी ती साहिल नावाच्या मुलाला ओळखायची असं सांगितलं आणि व्हिडीओमधील मुलगा तो असल्याचं वाटतंय असंही सांगितलं.
मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी साहिलच्या घरी छापा टाकला. मात्र तो फरार असल्याचं दिसून आलं. त्यानंतर साहिल कुठे गेला आहे यासंदर्भात चौकशी केली असता त्याच्या वडिलांनी माझ्या बहिणीने मला फोन करुन साहिल इकडे बुलंदशहरमध्ये माझ्या घरी अचानक आल्याचं सांगितलं अशी माहिती दिली. याच माहितीचा फायदा पोलिसांना झाला आणि त्यांना साहिलला अटक करता आली. साहील हा फ्रीज आणि एसी रिपेअरिंगचं काम करायचा. तो त्याचे आई-वडील आणि 3 बहिणींबरोबर राहतो. मृत मुलीच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे साहिलला कलम 302 अंतर्गत हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.