घरात सात दिवस पडून होता माय-लेकीचा मृतदेह, काय घडलं नेमकं? 'ते' CCTV फुटेज ठरणार पुरावा

Delhi Double Murder Case:दिल्लीत भररस्त्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 2, 2023, 12:08 PM IST
घरात सात दिवस पडून होता माय-लेकीचा मृतदेह, काय घडलं नेमकं? 'ते' CCTV फुटेज ठरणार पुरावा title=
Double Murder In Delhi Highly Decomposed Bodies Of Mother Daughter Found In Flat

Delhi Double Murder: दिल्लीतील शाहदरा परिसरात कृष्णा नगरमध्ये आई- मुलीची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास एक आठवडा दोघीचांदी मृतदेह घरातच पडून होता. सोसायटीतील रहिवाशांना दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घराची तपासणी केल्यानंतर या हत्येबाबत माहिती मिळाली आहे. हत्या कोणी व कशासाठी केली याचा अद्याप तपास लागलेला नाहीये. पोलिसांनी घराबाहेर लागलेले दोन सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत. 

सडलेल्या स्थितीत सापडले मृतदेह

६४ वर्षीय राजरानी आणि तिची ३० वर्षीय मुलगी गिन्नी अशी हत्या झालेल्या माय-लेकींची नावे आहेत. राजरानी या आकाशवाणीतील निवृत्त अधिकारी आहेत. तर त्यांचे पती हिरालाल संसदीय कार्यालय मंत्रालयात अधिकारी होते. गिन्नीव्यतिरीक्त त्यांच्या आणखी दोन मुली आहेत. दोघींचीही लग्न झाली आहेत. राजरानी त्यांच्या गिन्नी यामुलीसोबत कृष्णा नगरमधील फ्लॅटमधील दोघीच राहत होत्या. गिन्नीला बोलण्यास त्रास होत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच, राजरानी यांचे त्यांच्या दोन मुलीसोबत संपत्तीवरुन वाद होते. त्या दोघीही त्यांना भेटण्यासाठी क्वचितच येत होत्या. 

२५ मे रोजी घरात संशयित घुसताना दिसले

या प्रकरणात पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या व्हिडिओत दोन संशयित घरात घुसताना दिसत आहेत. २५ मेच्या रात्री साधारण १०.४५ वाजता दोघे घरात जाताना दिसत आहेत. त्यानंतर अर्धा तासाच्या अंतराने बाहेर पडत आहेत. यातील एक संशयित राजरानी यांचा नातेवाईक असल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी तपास सुरू केला आहे. 

सीसीटीव्हीत दिसलेले ते दोघे कोण?

राजरानी यांच्या घराला ऑटोमॅटिक टाळे लावले आहे. हत्येच्या दिवशी आतमधूनच हे टाळे उघडण्यात आले होते, असं संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर, घरातील अन्य दोन फ्लॅटमध्येही ऑटोमॅटिक टाळे लावण्यात आले आहेत. त्यामुळं विना परवानगी घरात प्रवेश करणे अशक्य आहे. अशावेळी पोलिसांना नातेवाईकांवरच संशय व्यक्त केला आहे. 

शेजाऱ्यांसोबत होते वाद-विवाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजराणी यांचे त्यांच्या शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध नव्हते. त्या नेहमी त्यांच्या मुलीसोबतच घरात राहत होत्या क्वचितच त्या घरातून बाहेर पडत होत्या. शेजाऱ्यांसोबतही कमी बोलणे-चालणे होते. बऱ्याचदा त्या बाहेरुनच जेवण मागवायच्या. 

काय आहे प्रकरण?

बुधवारी रात्री साधारण आठ वाजता पोलिसांना घरातच आई आणि मुलीचा मृतदेह सापडल्याची सूचना मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचताच, फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. फ्लॅट खोलताच आतमध्ये आई- मुलगी मृतावस्थेत सापडल्या. दोघींचे मृतदेह पूर्णपणे सडले होते. घरातील काही सामानही गायब होते. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.