मुंबई : भारतामध्ये लवकरच उत्तर भारतामध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसणार आहे. अशा आशयाचा एक मेसेज झपाट्याने व्हायरल होत आहे.
7 ते 15 एप्रिलदरम्यान 9.1 रिस्टर स्केलचा धक्का बसण्याची शक्यता आहे. असा मेसेज नासाच्या अहवालाने आला आहे अशा आशयाचा एक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये खरंच सत्य आहे की अफवा ... हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये उत्तर भारतात लवकरच मोठा भूकंप होणार आहे. या भूकंपाची तीव्रता सुमारे 9.1 - 9.2 इतकी असेल. हा भूकंप 7-15 एप्रिलदरम्यान येण्याची शक्यता आहे. हा भूकंप आत्तापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप ठरण्याची शक्यता आहे.
भूकंप झाल्यानंतर तुम्ही पॅनिक होण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर मोकळ्या मैदानावर जाणं अपेक्षित आहे. आजूबाजूला इमारती नसतील अशा ठिकाणी तात्काळ उभे रहावे.
व्हॉट्सअॅपवर पसरणारा हा भूकंपाचा मेसेज केवळ अफवा आहे. अशाप्रकारचे मेसेज पसरवून लोकांना घाबरवू नका किंवा आफवांना वाव देऊ नका. ही अफवा असण्यामागील एक कारण म्हणजे अजूनही भूकंपाचे पूर्वअनुमान करण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही.अशाप्रकारची भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. मेसेजमध्येही नासाची खोटी वेबसाईट लिंक देण्यात आली आहे. नासाची अधिकृत वेबसाईट https://www.nasa.gov/ आहे. तसेच नासाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.