लखनऊ: आपल्या देशात लग्न आणि लग्नातील किस्से कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. वधू पक्षाकडून मानपानात कमी राहिल्याने ऐनवेळी लग्न मोडल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथेही असाच प्रकार घडला. याठिकाणी मुलगी व्हॉटसअॅपवर जास्त वेळ घालवत असल्याने मुलाकडील मंडळींनी ऐनवेळी लग्नाला नकार दिला. त्यामुळे आता हे प्रकरण पोलिसांत पोहोचले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबरला हे लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या दिवशी मुलाकडची मंडळी लग्नमंडपात पोहोचलीच नाहीत. बराचवेळ वाट पाहिल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरी धाव घेतली. त्यावेळी तुमची मुलगी व्हॉटसअॅपवर जास्त वेळ घालवत असल्याने हे लग्न होऊ शकत नाही, असे कारण मुलाकडील मंडळींनी सांगितले.
यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेले. त्यावेळी मुलाकडची मंडळी लग्नासाठी ६५ लाखांचा हुंडा मागत असल्याचा आरोप वधू पक्षाकडील मंडळींनी केला आहे. आम्ही मुलाकडच्या लोकांना अनेक विनवण्या केल्या. परंतु, ते ऐकायला तयार नव्हते. अखेर हुंडा द्यायचे मान्य केल्यानंतर मुलाकडील मंडळी लग्नाला तयार झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.