राजकोट : देशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
चिदंबरम यांनी व्यापारी आणि व्यावसायिकांशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, २००४ ते २००९ या कालावधीत ८.५ टक्क्यांवर पोहोचलेल्या विकासदरात २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. देशात आलेल्या मंदीसदृश्य वातावरणाला प्रामुख्याने नोटबंदीचा निर्णय कारणीभूत आहे. चिदंबरम म्हणाले, विद्यमान अर्थमंत्री अरूण जेटली सांगतात की, देशाची अर्थव्यवस्था मजबूत स्थानावर आहे. तर, मग सरकारला बॅंकांचे भांडवलीकरण का करावे लागत आहे. प्रत्यक्षात देशात मंदीचे वातावरण आहे. आणि त्याला नोटबंदीचा निर्णय कारणीभूत आहे. नोटबंदीमुळे कोणत्याही प्रकारचा काळा पैसा सरकारला शोधता आला नाही. दोश आजूनही नोटबंदीच्या तडाख्यातून सावरला नाही.
नोटबंदीच्या निर्णयातून देश स्वत:ला सावरू पाहात होता. तोपर्यंत सरकारने जीएसटीचा दणका दिला. त्यामुळे जनता, उद्योग, व्यवसाय, व्यापारी, गुंतवणूकदार यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. जीएसटी वाईट नाही. पण, जीएसटीसोबत जो कायदा करण्यात आला आहे. तो वाईट असल्याची टीपण्णीही चिदंबरम यांनी या वेळी केली.
देशाला बुलेट ट्रेनची नाही, शिक्षणाची गरज
नोटबंदीचा निर्णय म्हणजे घरातील डास मारण्यासाठी चक्क घरालाच आग लावण्याचा प्रकार आहे. देशात सध्या बुलेट ट्रेनचे वारे वाहात आहे. पण, देशाला सध्या बुलेट ट्रेनची नव्हे तर, शिक्षणात फार मोठी मजल मारण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, आरोग्य या गोष्टींवर सरकारने अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.