नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. यात भारतासाठी एक धक्कादायक बातमी समोर येतेय. देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येत तरुणांची संख्या जास्त आहे. भारतात युवांची संख्या जास्त असून हीच देशाची ताकद आहे. याच जोरावर भारत आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहतो. पण युवा पिढी कोरोना संक्रमित आढळल्याने देशासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतासह ब्राझीलचा यामध्ये समावेश आहे.
भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमित होऊन रुग्णालयात भरती झालेल्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. ब्राझीलमध्ये वयवर्षे ५० हून कमी असून मरणाऱ्यांची संख्या ५ टक्के आहे. मेक्सिकोमध्ये २५ ते ४९ वयवर्षे असलेल्या कोरोना मृतांची संख्या एक चतुर्थांश आहे. भारत कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने चालला आहे. या महिन्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ५० टक्के लोकं हे ६० हून अधिक वयाचे होते.
विकसनशील देशांमध्ये तरुणांच्या मृत्युमागे वाईट आरोग्य यंत्रणा, गरिबी आणि असमानता याला जबाबदार धरलं गेलं आहे. द वॉशिंग्टन पोस्टने यासंदर्भात एक रिपोर्ट तयार केला आहे. त्यामध्ये आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीत याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. रुग्णालयांची दुरावस्था, हतबल पोलीस यंत्रणा, सोशल डिस्टन्सिंगचा अभाव ही कारण समोर आली आहेत.
यामध्ये सर्वात जास्त धोका ज्येष्ठ नागरिकांना असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले होते. पण मागच्या काही आठवड्यांच्या अहवालानंतर संक्रमण आणि अतिगंभीर प्रकरणांमध्ये वयवर्षे २० ते ४४ मधील संख्या जास्त असल्याचे निदर्शनास आले.