नवी दिल्ली : मला शिव्या दिल्या तरी चालतील पण श्रमिकांचा अपमान नको असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मी देशाचा चौकीदार आहे या वक्तव्याला विरोधी पक्षांनी 'चौकीदार चोर है' या मोहिमेने उत्तर दिले. यानंतर भाजपातर्फे 'मै भी चौकीदार' मोहिमेने सुरूवात केली आहे. पंतप्रधानांसहित भाजपाच्या सर्वच नेत्यांनी सोशल मीडियावरील आपल्या नावापुढे चौकीदार हे बिरूद लावले. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही स्वत:च्या नावापुढे चौकीदार लावले. ही मोहीम यशस्वी झाल्याचा दावा भाजपातर्फे करण्यात आला. त्यानंतर विरोधकांनी या मोहिमेवर हल्ला चढवला. त्यानंतर श्रमिकांचा अपमान करु नका असे वक्तव्य मोदींनी केले आहे.
मै चौकीदार मोहिमेविरूद्ध काँग्रेसतर्फे बेरोजगार मोहिमही चालवण्यात आली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस प्रचार मोहिमेवर घणाघात केला. काँग्रेसने चौकीदारीच्या पेशाला बदनाम केले. चौकीदारीच्या श्रमाला बदनाम केल्याचा आरोप त्यांनी केला. हीच नामदारांची संस्कृती असून श्रमिकांना बदनाम करणे हेच यांचे काम असल्याचा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे. मला शिव्या दिल्या तरी चालतील पण, श्रमिकाचा अपमान करू नका असे आवाहन त्यांनी काँग्रेसला केले. काँग्रेसने श्रमिकांच्या सन्मान ठेवावा असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या मोहिमेमुळेच भाजपाला 'मैं भी चौकीदार' मोहीम सुरू करावी लागली, असा आरोप काँग्रेसचा आहे. त्याचबरोबर 'मैं भी चौकीदार' या मोहिमे अंतर्गत करण्यात आलेली ट्विटस ही समर्थकांनी केलेली नसून 'बॉटस' ही संगणकीय प्रणाली वापरुन केल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे. 'बॉटस'प्रणाली वापरुन फेक अकाऊंटवरुन ट्विटसची संख्या वाढलेली दाखवली जाते, असे काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख सपकाळ यांनी म्हटले.
माजी मंत्री एम जे अकबर यांनीही नावापुढे 'चौकीदार' लावले... अकबर यांच्यावर मीटू प्रकरणी लैंगिक अत्याचाराचे आरोप असल्याने, यावर जोरदार टीका झाली. असा चौकीदार असेल तर देशातल्या महिला असुरक्षित राहतील, असे ट्विट अभिनेत्री रेणूका शाहणे यांनी केलं. देशात ज्यापद्धतीने तापमान वाढतेय तसेच राजकीय वातावरणही तापत आहे. सोसल मीडियावर सुरु असलेल्या चौकीदाराच्या खडाजंगीत स्पष्ट आहे की २०१९ चा निवडणुकीचा रणसंग्राम जितका रस्त्यावर रंगणार आहे त्यापेक्षा जास्त तो सोशल मीडियावरही रंगेल.