Sadhvi Harsha Richaria Video : अतिशय पवित्र आणि भारतात अध्यात्मिक विश्वामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये साधूसंत आणि साध्वी सहभागी झाल्य़ा आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यांतून साधू- साध्वी या मेळ्यात सहभागी होण्यासाठी आले असतानाच यातील काही चेहरे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
मॉडेलिंग, सूत्रसंचालन आणि अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर हर्षा रिछारियानं संन्यस्त मार्ग निवडला. मानसिक शांततेसाठी अध्यात्माच्या वाटेवर निघालेल्या साध्वी हर्षा रिछारियानं केशरी वस्त्र धारण करत निरंजनी आखाड्यातून आचार्य महामंडलेश्वर यांच्याकडून अध्यात्मातील अनेक बारकावे टीपले आणि त्याचं अध्ययनही केल्याचं सांगितलं जातं.
साध्वी म्हणून वारंवार होणारा उल्लेख पाहता आपण साध्वी नसून, सनातनाला आणखी जवळून ओळखण्यासाठीचा प्रयत्न करणाऱ्यांपैकीच एक आहोत, असंही हर्षा म्हणते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिथं ती, तरुण- तरुणींना अवघ्या 11 दिवसांमध्ये मनाजोग्या व्यक्तीचं प्रेम कसं मिळावं, यासाठीचा कानमंत्र देताना दिसत आहे.
@host_harsha या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तिचे एक ना अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. दरम्यान प्रेम मिळवण्यासाठीचा कानमंत्र दिला जाणाराच व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. आपल्याला मेसेज येत असून, त्या माध्यमातून आपल्या मनाजोग्या व्यक्तीचं प्रेम कसं मिळेल, जेणेकरून त्या व्यक्तीशी आपल्याला लग्न करता येईल आणि नात्यात कधीच दुरावाही येणार नाही? असेही प्रश्न विचारले जात आहेत असं तिनं सांगितलं.
प्रेमाविषयीच्या या प्रश्नाचं उत्तर देत हर्षा म्हणते, 'आज मी तुम्हाला मनाजोग्या व्यक्तीचं प्रेम कसं मिळवावं, जेणेकरून तुम्ही प्रेयसी, प्रियकरावर नियंत्रण मिळवू शकता याविषयी सांगणार आहे. यानंतर ते तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, तुम्हाला हवं तेच बोलणार आहे. तो मंत्र आहे ओम गिली गिली छू... ओम फट् स्वाहा...'
दर दिवशी या मंत्राचा 1008 वेळा जप केल्यास, सलग 11 दिवस हा जप सुरू ठेवल्यास परिणाम दिसेल अशी हमी हर्षा देताना दिसत आहे. 12 व्या दिवसापर्यंत काहीच फरक दिसला नाही, तर पुन्हा कमेंट करा मी नवा मंत्र देईन असंही तिनं फॉलोअर्सना सांगितलं आहे. मी मंत्र देईन, कारण मी स्वत: तो मंत्र शोधत आहे, असंही ती या व्हिडीओच्या शेवटी बोलताना दिसतेय. हर्षानं केललेा हा व्हिडीओ आणि हा मंत्र पाहता हे तिनं रीलसाठीच केल्यासं स्पष्ट होत आहे. असं असलं तरीही हा तिचा व्हिडीओ कमालीचा चर्चेत आहे हे नाकारता येत नाही.