नवी दिल्ली: राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर अजूनही त्यांचा उत्तराधिकारी पक्षाला सापडलेला नाही. मात्र, आता अचानकपणे अध्यक्षपदाच्या या शर्यतीमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव आघाडीवर आले आहे. काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी अध्यक्षपदासाठी मनमोहन सिंग यांचे नाव पुढे केल्याचे समजते. मनमोहन सिंग यांच्याकडे अध्यक्षपद देऊन त्यांच्या हाताखाली चार वेगवेगळ्या प्रदेशांचे नेतृत्त्व करणाऱ्या कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करावी, या पर्यायाचा काँग्रेसकडून गांभीर्याने विचार केला जात आहे.
स्वच्छ चारित्र्य ही मनमोहन सिंग यांची सर्वात जमेची बाजू आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्ष केल्यास लोकांना काँग्रेसविषयी विश्वास वाटेल. तसेच मनमोहन सिंग कोणत्याही गटाचे नसल्यामुळे संभाव्य गटबाजीचा धोकाही टळेल, असा अंदाज आहे.
मात्र, ८६ वर्षांच्या मनमोहन सिंग यांना ही जबाबदारी कितपत झेपेल, असा प्रश्नही काही जणांकडून उपस्थित केला आहे. काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मनमोहन सिंग यांना देशभरात दौरे करण्याबरोबरच जाहीर सभांमध्ये भाषणंही करावी लागतील. ही गोष्ट मनमोहन सिंग यांच्याविरोधात जात आहे. याशिवाय, त्यांच्यावर गांधी घराण्याच्या तालावर नाचणारे कळसूत्री बाहुले असल्याचा आरोपही होऊ शकतो.
अशा परिस्थितीत काही जणांकडून ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांचे नाव पुढे केले जात आहे. मुकुल वासनिक गेल्या ४० वर्षांपासून पक्ष संघटनेत काम करत आहेत. त्यांनी संघटनेतील अनेक महत्त्वाची पदे भुषविली आहेत. याशिवाय, स्वच्छ चारित्र्याचा दलित नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्यापाठोपाठ त्यांचे नाव आघाडीवर आहे.