नवी दिल्ली: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणारा बांगलादेशी कलाकार फिरदौस अहमद याचा व्हिसा मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून रद्द करण्यात आला. रायगंज लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार कन्हैया लाल अग्रवाल यांच्या प्रचारासाठी फिरदौस अहमद आला होता. याविरोधात भाजपकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी फिरदौस अहमदचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. यानंतर फिरदौस याला तात्काळ भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्याचे नावही काळ्या यादीत टाकण्यात आलेय. परराष्ट्र मंत्रालयाने पश्चिम बंगालमधील विदेश क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाला या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केल्याचे आदेशही दिले आहेत.
रायगंज मतदारसंघात कन्हैया लाल अग्रवाल यांच्या प्रचारासाठी रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी अन्य बंगाली कलाकारांच्या साथीने फिरदौस अहमदही रोड शो मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी परदेशी नागरिक निवडणुकीचा प्रचार करत असल्याचा मुद्दा भाजपने उपस्थित केला. या माध्यमातून उत्तर दिनाजपूर अल्पसंख्याक मतांसाठी लांगूलचालन सुरु असल्याचेही भाजपने म्हटले होते. एखादा परदेशी नागरिक तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात कसा सामील होऊ शकतो. उद्या तृणमूल प्रचारासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आणेल. आम्ही याचा निषेध करतो. तृणमूल काँग्रेस आम्हाला घाबरल्यामुळेच परदेशी कलाकारांना आणत असल्याची टीका पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केली.
MHA: After receiving report from Bureau of Immigration regarding visa violations committed by a Bangladesh National Mr Ferdous Ahmed(actor who campaigned for TMC), MHA has cancelled his business visa and issued him a leave India notice. He also has been blacklisted. pic.twitter.com/3lbqJEboEg
— ANI (@ANI) April 16, 2019
फिरदौस अहमद याने बांगलादेशी आणि बंगाली अशा मिळून जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केले आहे.