मुंबई : जम्मू-काश्मीरवर पंतप्रधानांच्या बैठकीपूर्वी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी शरद पवार आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची दहा दिवसांत दुसऱ्यांदा भेट झाली आहे. प्रशांत किशोर-शरद पवार यांची ही बैठक पुढील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांच्या मोठ्या रणनीतीचा भाग असू शकतो. समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र करण्याचे उद्दीष्ट आहे.
15 पक्षांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या सहभागी होणार की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. कॉंग्रेस बैठकीला हजर राहणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आतापर्यंत 7 पक्ष या बैठकीला हजेरी लावतील असं बोललं जात आहे. विरोधी पक्षाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीने मंगळवारी सकाळी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर आपण निवडणूक रणनीतिकार म्हणून काम करणार नाही अशी घोषणा करणारे प्रशांत किशोर यांनी सोमवारी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या दुसर्या बैठकीनंतर पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळात असे बोलले जात आहे की पुढील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष पुढच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात एक सामान्य उमेदवार उभे करू शकतात, त्यामुळे प्रशांत किशोर यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमुखांची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.