नवी दिल्ली: देशाच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केंद्र सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांची मदत घ्यावी, असा सल्ला काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. ते शनिवारी हैदराबाद येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी बेरोजगारी आणि आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, सर्वप्रथम आपल्याकडून चूक झाली हे केंद्र सरकारने मान्य करावे. तसेच बुडत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांचा सल्ला घ्यावा, असा उपाय पी. चिदंबरम यांनी सुचवला.
देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक - मनमोहन सिंग
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर ताशेरेही ओढले. मोदी सरकार हे देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वाधिक गरीब विरोधी सरकार आहे. सध्या ग्रामीण भारत आणि कृषी क्षेत्राची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे किमान आतातरी सरकारने आपल्याकडून चूक झाली, हे मान्य करायला हवे. तसेच डॉ. मनमोहन सिंग यांना पाचारण करून याबाबत काय उपाययोजना करता येतील, यावर सल्ला घ्यावा, असे चिदंबरम यांनी सांगितले.
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा अर्थसंकल्प- पंतप्रधान मोदी
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही चिदंबरम यांनी भाष्य केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे 'सत्यनारायणाची कथा' होती. भारतीय अर्थव्यवस्थेची नेमकी स्थिती जाहीर करण्यास त्या अनुत्सुक का आहेत? देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर (जीडीपी) कधीही सलग सहा महिने खालावत गेला नव्हता. आता सातव्या महिन्यात काय वाढून ठेवले आहे, ते मला माहिती नाही. परंतु, गेल्या आठ महिन्यांतील आकडे नकारात्मक आहेत. तरीही हे सरकार सर्वकाही नाकारण्याच्या मनस्थितीतच आहे, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली.