नवी दिल्ली : देशात रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. यानुसार, येत्या काळात तब्बल २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
देशात रोजगाराची संधी नसल्याची टीका होत असलेल्या मोदी सरकाने रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कंबर कसली आहे. लवकरच मोदी सरकार केंद्र आणि राज्य स्तरावर २० लाख रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु करणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्रालय आणि सरकारी विभागांसोबतच पब्लिक सेक्टरमधील जवळपास २४४ कंपन्यांचा समावेश आहे. केवळ रेल्वेतच सुरक्षेसंबंधी २ लाख नोकर भरती केली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारी विभागांमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि कुठल्या कार्यालयात आहेत यासंदर्भातील माहिती श्रम मंत्रालय गोळा करत आहे. ही माहिती गोळा केल्यानंतर एक प्लॅन केंद्र सरकारसमोर ठेवला जाईल आणि त्यानंतर नोकरी भरती सुरु करण्यात येईल.
केंद्रीय मंत्रालय स्तरावर जवळपास ६ लाख पदं रिक्त असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता श्रम मंत्रालय लवकरच यासंदर्भातील माहिती सेंट्रल पब्लिक सेक्टर इंटरप्रायझेसला देईल आणि त्यानंतर भरती प्रक्रिया सुरु होईल. जर केंद्र स्तरावर ही योजना यशस्वी झाली तर राज्य स्तरावरही अशीच भरती प्रक्रिया सुरु करण्यात येईल. यामुळे २० लाख तरुणांना नोकरी उपलब्ध होईल.