बिहारच्या पाटणा येथे कोर्टाबाहेरच कैद्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांनी कोर्टाच्या आवारात कैद्याला गोळ्या घालून ठार केलं. अभिषेक कुमार उर्फ छोटे सरकार असं हत्या झालेल्या कैद्याचं नाव आहे. त्याच्यावर हत्या तसंच इतर अनेक गुन्हे दाखल होते. सिकंदरपूर येथील तो रहिवासी होता. शहरातील बेऊर जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच हत्येनंतर दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
"त्याला दानापूर कोर्टात नेलं जात असताना दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी गोळ्या घालून त्याला ठार केलं. दोन्ही हल्लेखोरांना अटक करुन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. या हल्लेखोरांना कोणी पाठवलं होतं, तसंच हत्येमागील नेमकं कारण काय याचा शोध घेतला जाणार आहे," अशी माहिती पाटण्याचे पश्चिम पोलिस अधीक्षक (एसपी) राजेश कुमार यांनी दिली आहे.
हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडलं आणि खाली जमिनीवर पाडल्याचं दृश्यांमध्ये दिसत आहे. यानंतर त्यांना पोलिसांनी तसंच ओढत नेलं. पोलिसांनी घटनास्थळी चार गोळ्या सापडल्या आहेत. दरम्यान या घटनेनंतर कोर्टाबाहेर तणाव आहे.
"हल्लेखोर मिर्झापूर येथील आहेत. पोलिसांना घटनास्थळी चार बुलेट्स सापडल्या आहेत. कैद्याला नेमक्या किती गोळ्या घालण्यात आल्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही," असं राजेश कुमार यांनी सांगितलं आहे.
2019 मध्ये, दानापूर कोर्टाच्या बाहेर पोलीस पथकावर हल्ला केला होता. पोलिसांचं हे पथक कैद्यांना घेऊन जात होतं. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी ठार झाला होता. तर एकजण गंभीर जखमी झाला होता.