उत्तर प्रदेश पोलिसांनी 10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गोळ्या घालून जखमी केलं आहे. आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याची पिस्तूल खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला गोळ्या घालण्यात आल्या. आरोपीने 10 वर्षाच्या मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार केला होता. त्याच्यासह त्याचा एक सहकारीही होता. मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता.
पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गाजियाबादमधील लोणी येथे रविवारी मुलगी घराजवळून जात असलेली लग्नाची वरात पाहण्यासाठी गेली होती. यावेळी दोन्ही आरोपीनी तिला कारमधून घरी सोडण्याची ऑफर दिली. आरोपींनी कारमध्येच मुलीवर बलात्कार केल्यानंतर पळ काढला होता. आरोपींची ओळख नजीम आणि झकीर अशी पटली आहे.
"महिलेने मंगळवारी तक्रार दाखल केली होती. यानंतर नजीम आणि झाकीर यांना अटक केली होती. आम्ही नजीमला गुन्हा घडलेल्या ठिकाणी नेलं असता त्याने एका कॉन्स्टेबलची पिस्तूल खेचून घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला रोखण्यासाठी त्याच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडत जखमी करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे," अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यबली मौर्य यांनी दिली आहे.
भाजपचे स्थानिक आमदार नंदकिशोर गुर्जर म्हणालेत की, अशा गुन्ह्यांना जबाबदार असलेल्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा झाली पाहिजे. "अशा लोकांना यमलोकात (नरकात) पाठवले पाहिजे आणि त्यांची घरेही पाडली पाहिजेत," असं ते म्हणाले होते.