नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा का दिला, याचा उलगडा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात अजित पवार यांचे पत्र वाचून दाखविण्यात आले. अजित पवार यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. मी राष्ट्रवादीचा विधीमंडळ नेता आहे. आमच्याकडे ५४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र आहे. त्यामुळे आम्ही फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे सरकार राज्यात आले. मात्र, राज्यातील सत्तेचा पेच सुटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. भाजपने सरकार स्थापन करून सर्वांना चकीत केले खरे. मात्र, यावरुन टीका होत आहे. तर भाजपकडून याचे स्वागत करण्यात येत आहे. मात्र, भाजपच्या सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यावेळी सर्व दस्तऐवज घेऊन न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरु झाली आहे.
सत्ता स्थापनेसाठी भाजप सरकारला पाठिंबा देणारे आणि शनिवारी पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री राज्यपालांना पत्र दिले. मात्र या पत्रात नेमके काय होते, याची कोणाला माहिती नव्हती. ही माहिती सर्वोच्च न्यायालयात पुढे आली आहे. अजित पवार यांनी राज्यपालांकडे सादर केलेल्या पत्रात राष्ट्रवादीच्या सर्व ५४ आमदारांची नावे होती. त्यावर त्या सर्व आमदारांची स्वाक्षरी होती. अजित पवार यांनी लिहिले होते की, राज्यात जास्त काळ राष्ट्रपती राजवट राहू नये, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देत आहे. मी राष्ट्रवादीचा गटनेता आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत. हे पत्र २२ तारखेला रात्री राज्यपालांना सादर करण्यात आले. हे मराठीतील पत्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी सादर करण्यात आले. त्याचा अनुवाद करत तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितला.
भाजपच्या वतीने बाजू मांडतांना मुकूल रोहतगी यांनी महत्त्वाचा युक्तीवाद केला. ५४ आमदारांचा आम्हाला पाठिंबा असून, एक पवार आमच्या सोबत आहेत. तर दुसरे आमच्या विरोधात आहेत. त्यांच्या कुटुंबातील वादाशी आम्हाला देणंघेणे नाही. राज्यपालांनी पत्रांच्या आधारे निर्णय घेतला आहे, असे रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले.
माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसे पत्रही सादर करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलेले पत्रही न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे. माझ्यासोबत १७० आमदारांचा पाठिंबा असून, अपक्षही आमदार सोबत आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र तुषार मेहता यांनी न्यायालयाला वाचून दाखवले.